आयसीसीच्या क्रमवारीत कोहलीचा पराक्रम
क्रीडा

आयसीसीच्या क्रमवारीत कोहलीचा पराक्रम

अहमदाबाद : इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात भारताचा पराभव झाला. मात्र, भारताला हार पत्करावी लागली असली तरी, विराट कोहलीचे चाहते सुखावले आहेत. मागील काही दिवसांपासून विराटची बॅट शांत होती. मात्र, मागील दोन डावात विराटने अर्धशतके ठोकत टीकाकारांची तोंडे बंद केली. या कामगिरीसोबतच विराटने एका खास विक्रमाला गवसणी घातली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

नव्याने जाहीर झालेल्या फलंदाजांच्या आयसीसी टी-20 क्रमवारीत विराट पाचव्या स्थानावर आला आहे. त्याचे आता या यादीत 744 गुण जमा झाले आहेत. एकदिवसीय क्रमवारीत तो प्रथम आणि कसोटीत पाचव्या क्रमांकावर आहे. म्हणजेच, क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात तो अव्वल-5 फलंदाजांमध्ये आहे. त्यामुळे अशी कामगिरी करणारा तो जगातील पहिलाच फलंदाज ठरला आहे.

दुसरीकडे इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत दोनदा शून्यावर परतलेला भारतीय सलामीवीर के. एल. राहुलला या क्रमवारीत तोटा सहन करावा लागला आहे. टी-२० क्रमवारीत तो चौथ्या क्रमांकावर आला आहे. या यादीत इंग्लंडचा डेव्हिड मलान अव्वल स्थानी विराजमान आहे. त्याच्याकडे 894 रेटिंग गुण आहेत. ऑस्ट्रेलियाचा आरोन फिंच दुसऱ्या तर, पाकिस्तानचा बाबर आझम तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारतीय फलंदाजांच्या टी-२० क्रमवारीत श्रेयस अय्यर 32 स्थानांची झेप घेत 31व्या क्रमांकावर पोहोचला आहे. यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत 80व्या स्थानी आहे. त्याचबरोबर अष्टपैलू खेळाडूंमध्ये वॉशिंग्टन सुंदर 11व्या स्थानावर आहे.