अफगाणिस्तानच्या या खेळाडूची महेंद्रसिंह धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
क्रीडा

अफगाणिस्तानच्या या खेळाडूची महेंद्रसिंह धोनीच्या विक्रमाशी बरोबरी

नवी दिल्ली : अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार असगर अफगाणने भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. तो आता धोनीबरोबर सर्वाधिक टी-20 आंतरराष्ट्रीय सामने जिंकणारा कर्णधार बनला आहे. कर्णधार म्हणून त्याने आतापर्यंत 41 आंतरराष्ट्रीय टी -20 सामने जिंकले आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

कर्णधार म्हणून महेंद्रसिंह धोनीने 72 सामन्यांत 41 विजय मिळवले आहेत. तर, 28 सामन्यांमध्ये त्याला पराभवाला सामोरे जावे लागले. यापैकी एक सामना बरोबरी सुटला असून, दोन सामने अनिर्णित राखले आहेत. धोनीने कर्णधार म्हणून 2007ची टी-20 विश्वकरंडक स्पर्धा जिंकली होती.

असगर अफगाणनेही अशीच काहीशी कर्णधार म्हणून कामगिरी केली असून तो धोनीपेक्षा सरस आहे. त्याने आतापर्यंत 51 सामन्यांत अफगाणिस्तान संघाचे नेतृत्व केले आहे आणि 41 सामन्यात त्याने संघाला विजय मिळवून दिला आहे. त्याच्या नेतृत्वात अफगाणिस्तानला केवळ 9 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे, तर एक सामना अनिर्णित सुटला आहे.

इंग्लंडचा कर्णधार ईयॉन मॉर्गनने 33 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने जिंकले असून, या यादीत तो दुसर्‍या क्रमांकावर आहे. पाकिस्तानचा माजी कर्णधार सरफराज अहमद 29 विजयांसह तिसऱ्या आणि वेस्ट इंडिजचा डॅरेन सॅमी 27 विजयांसह चौथ्या क्रमांकावर आहे.