आशिया कपबाबत महत्त्वाची माहिती; आता या वर्षात होणार आयोजन
क्रीडा

आशिया कपबाबत महत्त्वाची माहिती; आता या वर्षात होणार आयोजन

नवी दिल्ली : यंदा होणारा आशिया कप अधिकृतपणे पुढे ढकलण्यात आला आहे. आता ही स्पर्धा २०२३मध्ये आयोजित करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. यावर्षी जून महिन्यात आशिया कपचे श्रीलंकेत आयोजन करण्यात आले होते. मात्र कोरोनाचे संकट पाहता आशिया क्रिकेट काउन्सिलला (एसीसी) ही स्पर्धा स्थगित करण्याची घोषणा केली.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मागच्या वर्षी ही स्पर्धा पाकिस्तानात होणार होती. मात्र तेव्हाही ही स्पर्धा पुढे ढकलण्यात आली होती. एसीसीने एका निवेदनात म्हटले आहे की, कोरोनामुळे होणारे धोके आणि निर्बंध लक्षात घेता एसीसी कार्यकारी मंडळाने आशिया चषक २०२१पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. यावर्षी स्पर्धा आयोजित करण्यासाठी एसीसीने सहभागी आणि भागीदारांसह काम केले. व्यस्त एफटीपीमुळे यंदा या स्पर्धेसाठी कोणतीही विंडो उपलब्ध नाही. या कारणास्तव मंडळाला आशिया चषक स्पर्धेचा हा हंगाम पुढे ढकलावा लागला आहे. आता हा हंगाम २०२३मध्ये होईल, कारण २०२२मध्येही आशिया कप होणार आहे. भविष्यात स्पर्धेची तारीख निश्चित होईल, असल्याचे एसीसीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

आशिया कप मागील वर्षी सप्टेंबरमध्ये होणार होता, पण कोरोनामुळे तो २०२१मध्ये पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. भारताने आतापर्यंत ७ वेळा आशिया कपावर नाव कोरले आहे. १९८४, १९८८, १९९०-९१, १९९५, २०१०, २०१६ आणि २०१८ साली भारताने आशिया कप जिंकला आहे.