बीसीसीआयचा मोठा निर्णय; ८७ वर्षांपासून चालू असलेली क्रिकेट स्पर्धा रद्द
क्रीडा

बीसीसीआयचा मोठा निर्णय; ८७ वर्षांपासून चालू असलेली क्रिकेट स्पर्धा रद्द

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक बोर्डाने (बीसीसीआय) एक मोठा निर्णय घेतला आहे. देशातील सर्वात मोठी स्पर्धा असलेली आणि ८७ वर्षापासून चालू असलेली रणजी ट्रॉफी स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयचे सचिव सचिन जय शहा यांनी पत्राद्वारे याबाबतची माहिती सर्व राज्य संघटनांना कळवली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

रणजी ट्रॉफीच्या दरम्यान मॅच फीसच्या रुपात दररोज ४५ जार रुपये कमावणाऱ्या खेळाडूंना नुकसान भरपाई देण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. मात्र महिलांच्या क्रिकेट हंगामाला मार्चमध्ये प्रारंभ करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. कोरोनाच्या साथीमुळे देशांतर्गत क्रिकेट हंगाम यंदा दिरंगाईने सुरू झाला आहे. सहा जैव-सुरक्षित केंद्रांवर सध्या सय्यद मुश्ताक अली ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धा सुरू आहे. रणजी करंडक स्पर्धेबाबत बैठकीत निर्णय होण्याची शक्यता होती. परंतु, याबाबत योग्य तोडगा निघू शकला नाही. बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुलीसुद्धा रणजी स्पर्धेसाठी आग्रही होता. पण अखेर रणजी स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सध्या सय्यद मुश्ताक अली ट्वेन्टी-२० स्पर्धा सुरु आहे. ही स्पर्धा झाल्यानंतर विजय हजारे ट्रॉफी स्पर्धा घेण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे. रणजी ट्रॉफी स्पर्धेत चार दिवसांच्या लढती असतात. विजय हजारे ट्रॉफीमनध्ये एक दिवसांच्या लढती असतात. देशातील सहा मुख्य शहरांमध्ये मुश्ताक अली स्पर्धेच्या धर्तीवर विजय हजारे स्पर्धा देखील खेळवली जाणार आहे. या स्पर्धेचे वेळापत्रक पुढच्या आठवड्यात अंतिम करण्यात येईल.