विजयी घौडदौड थांबली; दहा विजयानंतर भारताचा पराभव
क्रीडा

विजयी घौडदौड थांबली; दहा विजयानंतर भारताचा पराभव

सिडनी : सलग दहा विजयानंतर भारताचा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात पराभव झाला आहे. ऑस्ट्रेलियाने भारताचा १२ धावांनी पराभव केला असून तीन सामन्यांची मालिका भारताने २-१ ने जिंकली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

यष्टीरक्षक मॅथ्यू वेड आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी झळकावलेल्या धडाकेबाज अर्धशतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने अखेरच्या टी-२० सामन्यात १८६ धावांचा डोंगर उभा केला आहे. १८७ धावांचा सामना करताना भारताचा संघ ७ बाद १७४ धावांपर्यंत मजल मारू शकला. धावांचा पाठलाग करताना विराट कोहलीने एकाकी झुंज दिली विराटने ६१ चेंडूत ८५ धावांची खेळी केली. विराट बाद झाल्यावर भारतीय संघाच्या हातातून सामना सुटला होता. अखेरच्या षटकात शार्दूल ठाकूरने मोठे फटके मारण्याचा प्रयत्न केला पण तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही.

भारताने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. परंतु, भारतीय क्षेत्ररक्षकांनी अतिशय खराब कामगिरी करत सोपे झेल सोडले, ज्याचा फायदा ऑस्ट्रेलियाला मिळाला. वेड आणि मॅक्सवेल जोडीने भारतीय गोलंदाजांची धुलाई करत मैदानात चौफेर फटकेबाजी केली. वेडने ८० तर मॅक्सवेलने ५४ धावांची खेळी केली. पुनरागमन करणारा ऑस्ट्रेलियाचा कर्णधार फिंच सुंदरच्या गोलंदाजीवर भोपळाही न फोडता माघारी परतला. यानंतर मॅथ्यू वेड आणि स्टिव्ह स्मिथ यांनी दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करत संघाचा डाव सावरला. ही जोडी ऑस्ट्रेलियाला मोठी धावसंख्या उभारुन देणार असं वाटत असतानाच सुंदरने स्टिव्ह स्मिथचा त्रिफळा उडवत भारताला दुसरं यश मिळवून दिलं, स्मिथने २४ धावा केल्या.

दुसऱ्या बाजूने मॅथ्यू वेडने आपली फटकेबाजी सुरु ठेवत अर्धशतक झळकावलं. मैदानात जम बसल्यानंतर भारतीय गोलंदाजांचा समाचार घेत वेडने सिडनीच्या मैदानावर चौफर फटकेबाजी केली. ग्लेन मॅक्सवेलनेही आपल्याला मिळालेल्या जीवदानाचा पुरेपूर फायदा घेत काही सुरेख फटके खेळले. वेड आणि मॅक्सवेल जोडीने तिसऱ्या विकेटसाठी ९० धावांची भागीदारी केली. दरम्यान शार्दुल ठाकूरने वेडला तर नटराजनने मॅक्सवेलला माघारी धाडत कांगारुंची जोडी फोडली. भारताकडून वॉशिंग्टन सुंदरने २ तर नटराजन आणि शार्दुलने १-१ बळी घेतला.