#भारतबंद : “ना धर्म दा, ना सायन्स दा, मोदी है रिलायन्स दा,” पुण्यात शिखांची नारेबाजी
पुणे बातमी

#भारतबंद : “ना धर्म दा, ना सायन्स दा, मोदी है रिलायन्स दा,” पुण्यात शिखांची नारेबाजी

दिल्लीच्या वेशीवर कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी वेढा दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने केलेल्या शेतकरी कायद्यांविरोधात दिल्लीत गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. केंद्र सरकारचे मंत्री आणि शेतकरी यांच्यात झालेल्या बैठकांमधून अद्याप तोडगा निघालेला नाही. या कृषी कायद्यांविरोधात गेल्या १२ दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करत असून आज भारत बंदची हाक देण्यात आली होती.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी शांततेत बंद पाळण्यात आला. पुण्यातही शेतकरी आंदोलनाला जोरदार प्रतिसाद मिळाला. पुण्यात ठिकठिकाणी आंदोलन करत भारत बंदला पाठिंबा दर्शवण्यात आला. सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत देशभरात शांततेच्या मार्गाने हा बंद करण्यात आला. पिंपरी-चिंचवड शहरातही बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. शहरातील मुख्य बाजारपेठेत काही प्रमाणात दुकाने बंद होती, तर इतर ठिकाणी दुकाने सुरू असल्याचं चित्र होतं.

तर अलका चौक ते मंडई दरम्यान मोर्चा काढला जाणार होता. मात्र पोलिसांनी परवानगी नाकारल्याने, अलका चौकात ठिय्या आंदोलन करण्यात आले. “अगर देश बचाना है, तो मोदी को हटाना है”, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.अलका चौकातील आंदोलनात लहान मुलंदेखील सहभागी झाली होती. “ना धर्म दा, ना सायन्स दा, मोदी है रिलायन्स दा,” असं पोस्टरवर लिहिलेलं यावेळी दिसत आहे. लक्ष्मी रोडवरील सर्व दुकानं बंद ठेवण्यात आली होती.

श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डही भारत बंदला पाठिंबा देण्यासाठी बंद ठेवण्यात आलं होतं. शेतकरी संघटनांनी जाहीर केलेल्या देशव्यापी बंदला राज्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी पाठिंबा जाहीर केला होता. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीही यात सहभागी झाली होती पुण्यातील मार्केटयार्ड मध्ये असणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समितीत दररोज जिल्ह्यातील शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ पाहण्यास मिळते. मात्र आज  मार्केटयार्डमध्ये फारच कमी गर्दी पाहायला मिळाली.

दरम्यान, शेतकऱ्यांच्या भारत बंदच्या पार्श्वभूमीवर वेवगेळ्या राज्यात कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. बिहारमध्ये कडेकोट सुरक्षा आहे. एवढेच नाही, तर कायदा आणि सुव्यवस्थेचे उल्लंघण करणाऱ्यांवर कारवाईचे आदेशही देण्यात आले आहेत. तथापि, सरकारकडून शेतकऱ्यांच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. पाचवी बैठक निष्फळ ठरल्यानंतर आता शेतकरी संघटना आणि केंद्र सरकारमध्ये सहावी बैठक उद्या म्हणजेच, 9 डिसेंबरला होणार आहे. असं म्हटलं जात आहे की, यावेळी शेतकरी आपली मागण्यांवर ठाम राहणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मागण्यांपुढे केंद्र सरकार नमतं घेणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.