इंग्लंडच्या गोलंदाजांची कमाल; कसोटी क्रिकेटच्या इतिहासात दुसऱ्यांदा घडली ‘ही’ गोष्ट
क्रीडा

इंग्लंडच्या गोलंदाजांची कमाल; कसोटी क्रिकेटच्या इतिहासात दुसऱ्यांदा घडली ‘ही’ गोष्ट

नवी दिल्ली : इंग्लंड आणि श्रीलंका या दुसऱ्या कसोटी सामन्यात एक अजब गोष्ट घडली आहे. श्रीलंकेचा दुसरा डाव अवघ्या १२६ धावांत आटोपला. या सामन्यात आणखी एक अजब गोष्ट घडली आहे. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात केवळ दुसऱ्यांदाच असा प्रकार घडल्याचं दिसून आला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

कसोटी क्रिकेटच्या इतिहासात केवळ दुसऱ्यांदाच असा प्रकार घडला. ज्या गोलंदाजांनी पहिल्या डावात मिळून १० गडी बाद केले होते त्यापैकी एकालाही दुसऱ्या डावात गडी बाद करता आला नाही. तसेच दुसऱ्या डावात ज्या गोलंदाजांनी मिळून दहा बळी मिळवले, त्यांना पहिल्या डावात एकही बळी घेता आला नव्हता.

श्रीलंकेच्या दुसऱ्या डावात इंग्लंडकडून डॉम बेस आणि जॅक लीचने प्रत्येकी ४ गडी टिपले तर कर्णधार जो रुट याने २ बळी घेतले. हे तिघेही इंग्लंडचे फिरकीपटू आहेत. या सामन्यात श्रीलंकेच्या पहिल्या डावात इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांनी त्यांचे दहाच्या दहा बळी घेतले होते. वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने ६, मार्क वूडने ३ आणि सॅम करनने १ गडी माघारी धाडला होता.

याआधी असा प्रकार इंग्लंडच्या गोलंदाजांसोबतच झाला होता. ओव्हल मैदानावर २०१९ साली इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्यात पहिल्या डावात इंग्लंडकडून जोफ्रा आर्चर (६), सॅम करन (३) आणि ख्रिस वोक्सने (१) गडी बाद केले होते. तर दुसऱ्या डावात स्टुअर्ट ब्रॉड (४), जॅक लीच (४) आणि जो रुट (२) यांनी बळी मिळवले होते.