आयपीएलमध्ये दिसणार दहा संघ; नव्या संघासाठी निघालं टेंडर
क्रीडा

आयपीएलमध्ये दिसणार दहा संघ; नव्या संघासाठी निघालं टेंडर

नवी दिल्ली : आयपीएलच्या १५व्या हंगामात आणखी दोन नवीन संघ आयपीएलमध्ये खेळताना दिसतील. त्यापैकी एका संघाच्या मालकी आणि संचालन करण्यासाठी बीसीसीआयने निविदा जाहीर केली आहे. निविदा खरेदी करण्याची अंतिम तारीख ५ ऑक्टोबर निश्चित करण्यात आली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

आयपीएलच्या गव्हर्निंग काऊन्सिलने निविदा प्रक्रियेद्वारे बोली आमंत्रित केल्या आहेत. यात काही नियम आणि अटी घालण्यात आल्या आहेत. पात्रता सिद्ध करणे, बोली सादर करण्याची प्रक्रिया, प्रस्तावित नवीन संघांचे अधिकार आणि दायित्वे इत्यादी घटक निविदा आमंत्रणमध्ये समाविष्ट आहे, जे नॉन-रिफंडेबल शुल्काची भरपाई मिळाल्यावर उपलब्ध केले जातील. हे शुल्क १० लाख रुपये इतके असेल.

केवळ व्यक्ती किंवा ग्रुप निविदा खरेदी केल्यानंतर आयपीएल संघासाठी बोली लावण्यास पात्र होणार नाही. त्याला उर्वरित अटी आणि मापदंडांचे पालन करावे लागेल. कोणतेही कारण न देता कोणत्याही टप्प्यावर बोली प्रक्रिया रद्द करण्याचा किंवा त्यात बदल करण्याचा अधिकार बीसीसीआयला आहे. बोर्डाने एका संघाची मूळ किंमत सुमारे २ हजार कोटी रुपये ठेवली आहे. अशा स्थितीत बीसीसीआयला या २ संघांकडून सुमारे ५ हजार कोटी मिळू शकतात. पुढील हंगामापासून ६० ऐवजी ७४ सामने खेळले जातील. यातून बीसीसीआयला किमान ५ हजार कोटींची अपेक्षा आहे.

मालक होण्यांसाठी यांच्यामध्ये शर्यत
नवीन संघांसाठी अहमदाबाद, लखनऊ आणि पुणे या शहरांची नावे समोर आली आहेत. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियम आणि लखनऊमधील एकाना स्टेडियम ही फ्रेंचायझींची निवड असू शकते, कारण या स्टेडियमची क्षमता अधिक आहे. अनेक व्यावसायिक कंपन्या फ्रेंचायझी खरेदी करण्याच्या शर्यतीत आहेत. अदानी ग्रुप, आरपीजी संजीव गोएंका, फार्मास्युटिकल कंपनी टोरेंट आणि एक बँक हे सर्व आयपीएलमध्ये त्यांच्या उपस्थितीसाठी प्रयत्न करत आहेत.