चेन्नई सुपर किंग्जचा राजस्थानवर 45 धावांनी दणदणीत विजय
क्रीडा

चेन्नई सुपर किंग्जचा राजस्थानवर 45 धावांनी दणदणीत विजय

मुंबई : चेन्नई सुपर किंग्जने राजस्थान रॉयल्सवर 45 धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे. नाणेफेक गमावलेल्या चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना सुरेश रैना, फाफ डु प्लेसिस आणि ड्वेन ब्राव्हो यांच्या योगदानाच्या जोरावर 20 षटकात 9 बाद 188 धावा केल्या. चेन्नईच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानकडून जोस बटलर (49) वगळता इतर फलंदाजांना खास काही करता आले नाही. 20 षटकात राजस्थानला 9 बाद 143 धावांपर्यंतच मजल मारता आली. चेन्नईकडून रवींद्र जडेजा आणि मोईन अली यांनी दमदार गोलंदाजी करत राजस्थानचे कंबरडे मोडले. अलीला सामनावीर पुरस्कार मिळाला. राजस्थानचा हा लीगमधील दुसरा पराभव ठरला. विशेष म्हणजे, चेन्नईचा कर्णधार म्हणून धोनीचा हा 200वा सामना होता.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

चेन्नईने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदान उतरलेल्या मनन वोहरा आणि जोस बटलर यांनी राजस्थानच्या डावाची सुरुवात केली. 30 धावांची भागीदारी केल्यानंतर सॅम करनने वोहराला बाद केले. संजू सॅमसनही १ धाव करून माघारी परतला. बटलर बाद झाल्यानंतर जडेजाने शिवम दुबेला पायचित पकडत राजस्थानला अजून संकटात टाकले. त्यानंतर पुढच्याच षटकात मोईन अलीने डेव्हिड मिलरला पायचित पकडले.

15व्या षटकात मोईन अलीने रियान पराग (3) आणि ख्रिस मॉरिसला (0) पॅव्हेलियनचा मार्ग दाखवला. राहुल तेवतिया आणि जयदेव उनाडकट यांनी फटकेबाजी करत सामन्यात रंगत निर्माण केली. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता. 20 षटकात राजस्थानला 9 बाद 143 धावांपर्यंतच मजल मारता आली. चेन्नईकडून मोईन अलीने केवळ 7 धावा देत सर्वाधिक 3 बळी घेतले. सॅम करन आणि रवींद्र जडेजा यांना प्रत्येकी 2 बळी घेता आले.