धोकादायक आहे हाँगकाँगचा संघ, ४ वर्षापूर्वी पाहा भारताची काय अवस्था केली होती
क्रीडा

धोकादायक आहे हाँगकाँगचा संघ, ४ वर्षापूर्वी पाहा भारताची काय अवस्था केली होती

दुबई: आशिया कपमध्ये भारतीय संघाची दुसरी लढत हाँगकाँगविरुद्ध आज ३१ ऑगस्ट रोजी होणार आहे. ही लढत दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार आहे. टी-२० क्रिकेटमध्ये भारत आणि हाँगकाँग यांची ही पहिलीच मॅच आहे. याआधी चार वर्षापूर्वी आशिया कपमध्ये याच मैदानावर भारत आणि हाँगकाँग यांची लढत झाली होती.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

चार वर्षापूर्वी झालेल्या आशिया कप स्पर्धेत भारताचे नेतृत्व रोहित शर्मा करत होता. तेव्हा नियमीत कर्णधार विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली होती. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करत ७ बाद २८५ धावा केल्या होत्या. सलामीवीर शिखर धवनने १२७ तर अंबाती राडयूने ६० धावा केल्या. अखेरच्या काही षटकात हाँगकाँगने शानदार गोलंदाजी केली होती. महेंद्र सिंह धोनीला भोपळा फोडता आला नव्हता. भारताला अखेरच्या १० षटकात ५० धावा देखील करता आल्या नव्हत्या.

भारताने दिलेल्या विजयाचे लक्ष्य पार करण्यासाठी मैदानात उतरलेल्या हाँगकाँगकडून अंशुमन रथ आणि निजकत खान यांनी भारतीय गोलंदाजांना विकेटसाठी ३४ षटकापर्यंत वाट पाहायला लावली. भारताकडे भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, शार्दुल ठाकू, युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादव सारखे गोलंदाज होते. तरी हाँगकाँगच्या सलामीच्या जोडीने विकेट दिली नाही. रथ आणि खान यांनी पहिल्या विकेटसाठी १७४ धावा केल्या. मधल्या फळीत कमी अनुभवाचे फलंदाज असल्याने हाँगकाँगला फटका बसला. एक वेळ अशी होती की त्यांना विजयासाठी ९६ चेंडूत ११२ धावांची गरज होती आणि १० विकेट हातात होत्या.

रथला कुलदीप यादवने ७३ धावांवर बाद केले. त्यानंतर खान ९२ धावांवर माघारी परतला. ५० षटकात हाँगकाँगला २५९ धावा करता आल्या आणि भारताने ही लढत २६ धावांनी जिंकली.

सध्या देखील हाँगकाँगचा संघ शानदार फॉर्ममध्ये आहे. आशिया कप पात्रता फेरीत त्यांनी सलग ३ लढती जिंकल्या होत्या. निजकत खान हा संघाचा कर्णधार आहे. आघाडीची फलंदाजी चांगली असून भारतासाठी धोकादायक ठरू शकते.