आयपीएलचं ठरलं! यूएईत होणार उर्वरित हंगाम
क्रीडा

आयपीएलचं ठरलं! यूएईत होणार उर्वरित हंगाम

नवी दिल्ली : आयपीएल २०२१च्या उर्वरित सामन्यांबाबत महत्त्वाचे अपडेट समोर आले असून उर्वरित हंगाम यूएईत होणार आहे. सप्टेंबर-ऑक्टोबरच्या महिन्यात हे सामने खेळवण्यात येतील. या महिन्यांत भारतातील पावसाळ्याचा विचार करता बीसीसीआयने उर्वरित हंगाम यूएईत हलवण्याचा निर्णय घेतला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

बीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी ही माहिती दिली. करोनामुळे यंदाची आयपीएएल स्पर्धा २९ सामन्यानंतर स्थगित करण्यात आली होती. आज (ता. २९) बीसीसीआयची विशेष बैठक घेण्यात आली. यात सदस्यांनी आयपीएल पुन्हा सुरू करण्यास एकमताने सहमती दर्शविली. बीसीसीआय टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन भारतातच करण्यासाठी उत्सुक आहे. येत्या १ जूनला होणारी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेची (आयसीसी) कार्यकारी परिषदेची बैठक निर्णायक ठरणार आहे. परंतु भारतामधील कोरोनास्थिती आणखी काही महिन्यांनी आढावा घेऊन निर्णय घ्यावा, अशी विनंती बीसीसीआयकडून करण्यात आली आहे.

विश्वचषक स्पर्धेच्या कालखंडात भारतात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर अमिरातीच्या प्रस्तावावर गांभीर्याने विचार केला जात आहे. विश्वचषकासाठी अमिरातीचा निर्णय घेण्यात आल्यास स्टेडियमचा आधीच ताबा घेण्यात येईल. परिणामी आयपीएलचे अमिरातीत आयोजन करणे कठीण जाईल.

आयपीएल २०२१ बंद दरवाजांच्या मागे खेळवण्यात येत होते. २९ सामने खेळवले गेल्यानंतर कोरोनाने बायो बबलमध्ये एन्ट्री घेतली. कोलकाता नाईट रायडर्सचे खेळाडू वरुण चक्रवर्ती आणि संदीप वॉरियर संक्रमित आढळले. चेन्नई सुपर किंग्जचा गोलंदाजी प्रशिक्षक बालाजी संक्रमित असल्याचे आढळले. त्यानंतर दुसर्‍या दिवशी दिल्ली कॅपिटल्स संघाचे दोन खेळाडू अमित मिश्रा आणि सनरायझर्स हैद्राबादच्या वृद्धिमान साहा यांना संसर्ग झाल्याचे आढळले होते.