भारतीय महिला क्रिकेटपटू मिताली राजचा नवा विक्रम
क्रीडा

भारतीय महिला क्रिकेटपटू मिताली राजचा नवा विक्रम

नवी दिल्ली : आयसीसीने आज (ता. २१) मंगळवारी महिला क्रिकेटपटूंसाठी ताजी वनडे क्रमवारी जाहीर केली. यामध्ये भारतीय कर्णधार मिताली राजने पुन्हा एकदा अव्वल स्थान पटकावले आहे. फलंदाजांच्या क्रमवारीत ती पहिल्या स्थानावर पोहोचली आहे. नवीन रँकिंगमध्ये तीन भारतीय खेळाडूंना फायदा झाला आहे. फलंदाजांमध्ये संघाची सलामीवीर स्मृती मंधानालाही स्थान मिळाले असून ती आता सातव्या स्थानावर पोहोचली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

लिझेल ली दुसऱ्या स्थानावर घसरली आहे. याशिवाय तिसऱ्या स्थानावर एलिसा हिली, चौथ्या क्रमांकावर टॅमी बाउमेंट आणि पाचव्या स्थानावर न्यूझीलंडची माजी कर्णधार एमी सॅटरवेट आहे. महिला गोलंदाजांत भारतीय गोलंदाज दीप्ती शर्मा चौथ्या क्रमांकावर पोहोचली आहे. तिने कॅरेबियन गोलंदाज स्टेफनी टेलरची जागा घेतली आहे. टेलर आता एका स्थानाच्या नुकसानीसह पाचव्या स्थानावर घसरली आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियन स्टार अष्टपैलू एलीस पेरी या क्रमवारीत अव्वल स्थानावर कायम आहे.

भारतीय कर्णधार मिताली राजने मंगळवारी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये अर्धशतक झळकावले, तिने सलग पाचवे अर्धशतक झळकावले. यादरम्यान तिने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत २० हजार धावांचा टप्पाही पार केला आहे. मितालीने गेल्या वर्षी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सलग चार अर्धशतके केली होती आणि या मालिकेच्या पहिल्या सामन्यातही मितालीने अर्धशतक केले आहे.