ऑस्ट्रलियाविरुद्धचा सामना अनिर्णित; दुसऱ्या डावात साहाचे अर्धशतक
क्रीडा

ऑस्ट्रलियाविरुद्धचा सामना अनिर्णित; दुसऱ्या डावात साहाचे अर्धशतक

सिडनी : ऑस्ट्रेलिया अ संघाविरुद्धचा सराव सामना अनिर्णितावस्थेत संपला असून सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारत अ संघाला दुसऱ्यांदा फलंदाजीची संधी मिळाली. परंतु मध्यमगती गोलंदाज मार्क स्टीकेटीपुढे त्यांचा निभाव लागला नाही. ऑस्ट्रेलियन गोलंदाजासमोर केवळ यष्टीरक्षक वृद्धीमान साहा तग धरू शकला. त्याने १०० चेंडूंचा सामना करीत ५४ धावा केल्या. पहिल्या डावात ५९ धावांनी पिछाडीवर पडलेल्या भारत अ संघाने आपला दुसरा डाव ९ बाद १८९ धावसंख्येवर घोषित केला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला निर्णायक विजयासाठी १५ षटकांत १३० धावांची आवश्यकता होती. पण त्यांना एक बाद ५२ धावांपर्यंतच मजल मारता आली.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

विराट कोहली पहिल्या कसोटीनंतर पितृत्वाच्या रजेसाठी मायदेशी परतल्यावर उर्वरित सामन्यांत भारताचे नेतृत्व करणारा उपकर्णधार अजिंक्य रहाणे दुसऱ्या डावात फक्त २८ धावा करू शकला. पहिल्या डावात त्याने नाबाद शतक झळकावले होते. पृथ्वी शॉ (१९) आणि शुभमन गिल (२९) या युवा सलामीवीरांनी ३७ धावांची भागीदारी केली. कॅमेरून ग्रीनने दोघांनाही बाद केले. चेतेश्वर पुजाराला मायकेल नीसारने शून्यावर तंबूत धाडले. हनुमा विहारीने २८ धावा केल्या.

धावफलक
पहिला डाव : भारत अ – ९ बाद २४७ (डाव घोषित)
पहिला डाव : ऑस्ट्रेलिया अ – ९ बाद ३०६ (डाव घोषित) कॅमेरून ग्रीन नाबाद १२५; उमेश यादव ३/४८, मोहम्मद सिराज ३/८३
दुसरा डाव : भारत अ – ९ बाद १८९ (डाव घोषित) वृद्धिमान साहा ५४; मार्क स्टीकेटी ५/३७
दुसरा डाव : ऑस्ट्रेलिया अ – १५ षटकांत १ बाद ५२ (मार्कस हॅरिस नाबाद २५; उमेश यादव १/१४)