अनिल कपूरच्या चित्रपटातील ‘त्या’ सीनवर हवाई दलाला आक्षेप; सीन काढून टाकण्याची मागणी
मनोरंजन

अनिल कपूरच्या चित्रपटातील ‘त्या’ सीनवर हवाई दलाला आक्षेप; सीन काढून टाकण्याची मागणी

नवी दिल्ली : चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि अभिनेता अनिल कपूर यांचा आगामी सिनेमा ‘AK vs AK’ सध्या चांगलाच चर्चेत आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला. मात्र भारतीय हवाई दलाने यातल्या एका सीनवर आक्षेप नोंदवला असून तो त्यातून काढून टाकण्याची विनंती केली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

चित्रपटाच्या व्हिडीओमध्ये अनिल कपूर हवाई दलाची वर्दी घालून आणि आक्षेपार्ह शब्दांचा वापर करताना दिसतोय. भारतीय हवाई दलाने यावर तीव्र आक्षेप नोंदवत, हा सीन सिनेमातून डिलीट करण्याची मागणी केली आहे. याबाबत हवाई दलाने ट्वीट करत हा सीन काढून टाकण्याची विनंती केली आहे. हवाईदलाने ‘AK vs AK’ चा व्हिडीओ रिट्वीट करत, एक ट्वीट केले आहे. ‘या व्हिडीओत हवाई दलाच्या वर्दीचा चुकीचा वापर केला गेला आहे. भाषाही आक्षेपार्ह आहे. भारतीय सशस्त्र दलांच्या सैनिकांच्या व्यवहाराशी हा व्हिडीओ कुठेही सुसंगत नाही. हा सीन चित्रपटातून वगळला जावा,’ असे ट्वीट हवाई दलाने केले आहे.

यापूर्वीही बॉलिवूडचे काही सिनेमे व वेब शो याच कारणांमुळे वादात सापडले आहेत. अलीकडे एकता कपूरच्या एका वेबसीरिजमध्ये लष्कराच्या पोशाखातील एका पात्रावर आक्षेपार्ह दृश्ये चित्रीत करण्यात आली होती. यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. तर अभिनेत्री सारा अली खानच्या देखील गुंजन सक्सेना सिनेमावर आक्षेप घेण्यात आले होते.

दरम्यान, अनिल कपूर आणि अनुराग कश्यप चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अनिल व अनुराग दोघेही ट्वीटरवर दोघेही खरे वाटावे इतके भांडले. पण नंतर ट्वीटरवरचे हे भांडण नुसता प्रमोशनचा फंडा असल्याचे स्पष्ट झाले. यातलाच एक व्हिडीओ पाहून भारतीय हवाई दलाने लगेच आपला आक्षेप नोंदवला.

‘सेक्रेड गेम्स’ फेम विक्रमादित्य मोटवानी हा सिनेमा दिग्दर्शित करतोय. सिनेमात अनुराग अनिल कपूरच्या मुलीचे अपहरण करतो. आपल्या मुलीला शोधण्यासाठी अनिलकडे फक्त 10 तास असतात. याच 10 तासांचा ड्रामा सिनेमात पाहायला मिळणार आहे. येत्या 24 तारखेला हा सिनेमा नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होतोय.