शेतकरी आंदोलनामागे चीन आणि पाकिस्तानचा हात; रावसाहेब दानवेंचा अजबगजब दावा
राजकारण

शेतकरी आंदोलनामागे चीन आणि पाकिस्तानचा हात; रावसाहेब दानवेंचा अजबगजब दावा

जालना : “शेतकरी आंदोलनामागे देशाबाहेरील षडयंत्र असून चीन आणि पाकिस्तानचा हात आहे. हे आंदोलन शेतकऱ्यांचं आंदोलन नाही” केंद्रीय राज्यमंत्री आणि भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी धक्कादायक विधान केलं आहे. तसेच, या देशामध्ये पहिल्यांदा मुस्लीम समाजाला उचकवलं आणि सांगितलं सीएए आणि एनआरसीमुळे मुस्लिमांना देशातून बाहेर जावं लागेल”. एखादा तरी मुसलमान बाहेर गेला का? अशी विचारणाही यावेली रावसाहेब दानवे यांनी केली. जालना जिल्ह्यात एका आरोग्य केंद्राच्या उदघाटनावेळी ते बोलत होते.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचे पडसाद संपूर्ण देशभर पहालाया मिळाले. शेतकरी आंदोलनाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. अशातच रावसाहेब दानवे यांनी केलेल्या या विधानामुळे शेतकरी आंदोलनावरुन आता नव्या वादाला फोडणी मिळाली आहे. “आता जे आंदोलन सुरू आहे ते शेतकऱ्यांचं आंदोलन नाही. याच्या पाठीमागे चीन आणि पाकिस्तानचा हात आहे. या देशामध्ये मुस्लिम समाजाला उचवलं गेलं आणि सीएए, एनआरसीमुळे मुस्लिमांना देशाबाहेर जावं लागेल असं सांगितलं गेलं. पण एखादा तरी मुस्लिम नागरिक बाहेर गेला का?” , असं रावसाहेब दानवे म्हणाले.

दिल्लीत सुरू असलेले आंदोलन सुटाबुटातल्या लोकांचे असून केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी आहे, असेही दानवे म्हणाले. तर दुसरीकडे रावसाहेब दानवेंच्या वक्तव्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी टीका केली आहे. “भाजपाच्या नेत्यांना किती मस्ती आणि उन्माद आहे हे त्यांच्या वक्तव्यावरुन दिसत आहे. दानवे स्वत: अन्न आणि सार्वजनिक वितरण व्यवस्था पाहतात. त्यांनी जबाबदारीने बोलणं अपेक्षित आहे. दिल्लीत पाकिस्तान आणि चीनचे शेतकरी येऊन आंदोलन करतायत म्हणते यावरुन भाजपाच्या शेतकऱ्यांसाठी काय भावना आहेत हे दिसून येतं. हे निषेधार्ह आहे”. असे राजू शेट्टी यांनी म्हंटले आहे.