एका खेळीत के एल राहूलचे सहा विक्रम
क्रीडा

एका खेळीत के एल राहूलचे सहा विक्रम

लॉर्ड्स : सलामीवीर के. एल. राहुलने गुरुवारी लॉर्ड्सवर शतकी खेळी केली. या शतकी खेळीत त्याने कारकीर्दीमधील सहावे शतक केले आहे. भारताला या मजबूत स्थितीमध्ये आणण्यात सर्वात मोठं योगदान देणाऱ्या राहुलने या एका शतकासहीत सहा विक्रम आपल्या नावावर केले आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

सर्वाधिक शतकं करणाऱ्या भारतीयांच्या यादीत के एल राहूल या शतकासहित २४ व्या स्थानी पोहोचला आहे. त्याने या शतकासहीत एम. एस. धोनी आणि मंसूर अली खान पतौडी यांच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. या दोघांनीही कसोटीमध्ये प्रत्येकी सहा शतकं झळकावली आहेत.

सलामीवीर म्हणून राहुलचे हे परदेशातील चौथे शतक आहे. आशियाबाहेरील देशांमध्ये सर्वाधिक शतकं करणारा भारतीय सलामीवीर म्हणून के. एल. राहुल दुसऱ्या स्थानी आहे. केवळ सुनील गावस्कर यांनीच सलामीवीर म्हणून राहुलपेक्षा अधिक शतकं झळकावली आहेत. गावस्कर यांनी सलामीला फलंदाजी करताना १५ शतकं केली आहेत. कालच्या शतकासहीत राहुलने सर्वाधिक शतकं झळकावणाऱ्या भारतीय सलामीवीरांच्या यादीत रोहित शर्मासोबत स्थान मिळवलं आहे.

रोहित शर्मासोबत राहुलने १२६ धावांची सलामी नोंदवली. त्यानंतर तिसऱ्या विकेट्ससाठी त्याने विराट कोहलीच्या सोबतीने ११७ धावा जोडल्या. कोणत्याही भारतीय खेळाडूने दोन शतकी भागीदाऱ्या करण्याची ही लॉर्ड्सवरील पहिलीच वेळ ठरली आहे.

लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर शतक झळकवणारा के. एल. राहुल हा १० वा फलंदाज ठरला आहे. दिलीप वेगसरकरांनी या मैदानावर सर्वाधिक म्हणजेच तीन शतक झळकावून येथे सर्वाधिक शतकं झळकावणारे भारतीय ठरले आहेत. सौरभ गांगुली, राहुल द्रविड, अजहरुद्दीन, गुंडप्पा विश्वनाथ, अजिंक्य रहाणे आणि अजित आगरकरने या मैदानावर शतक झळकावलं आहे.

या मैदानावर शतक झळकावणारा राहुल हा तिसरा सलामीवीर आहे. या आधी वीनू मांकड आणि रवि शास्त्रींनी हा विक्रम केला आहे.

३५ वर्षांनी प्रथमच भारताच्या दोन्ही सलामीवीरांनी आशिया खंडाबाहेरील कसोटी सामन्यात प्रत्येकी ७५ धावांहून अधिक धावा केल्या. यापूर्वी १९८६मध्ये सुनील गावस्कर (१७२) आणि कृष्णमाचारी श्रीकांत (११६) यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध अशी कामगिरी केली होती.