भारताची अवस्था बिकट; अवघ्या ७८ धावांत धुरळा
क्रीडा

भारताची अवस्था बिकट; अवघ्या ७८ धावांत धुरळा

हेडिंग्ले : दुसऱ्या कसोटी सामन्यातील पराभावाचा वचपा काढत इंग्लंडने भारताचा पहिला डाव ७८ धावांवर गुंडाळला आहे. तिसऱ्या कसोटीत भारताचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली खरी, पण त्याचा हा निर्णय पूर्णपणे फसला. रोहित शर्मा (१९) आणि अजिंक्य रहाणे (१८) सोडले, तर एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

सुरुवातीला जेम्स अँडरसनने आणि शेवटी ओली रॉबिन्सन, क्रेग ओव्हर्टन आणि सॅम करनने विकेट घेत भारताच्या डावाला खिंडार पाडले. अँडरसन आणि ओव्हर्टन यांना प्रत्येकी तीन, तर रॉबिन्सन आणि करनला प्रत्येकी दोन बळी घेता आले. पुजारा एका धावेवर बाद झाला. कर्णधार विराट कोहलीला अवघ्या ७ धावा करता आल्या. त्यानंतर रोहित शर्मा आणि अजिक्य रहाणे यांच्याकडून मोठ्या भागीदारीची अपेक्षा होती. पण संघाचे अर्धशतक फलकावर लावल्यानंतर ओली रॉबिन्सनने रहाणेला बाद केले.

लंचनंतरही इंग्लंडने आपला तिखट मारा सुरूच ठेवला. ओली रॉबिन्सनने ऋषभ पंतला वैयक्तिक २ धावांवर बाद केले. त्यानंतर सामन्यात संधी मिळालेल्या क्रेग ओव्हर्टनने सलामीवीर रोहित शर्मा (१९) आणि मोहम्मद शमीला (०) बाद करत भारताला अजून संकटात टाकले. क्रेग ओव्हर्टननेच ४१व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर मोहम्मद सिराजला रूटकरवी झेलबाद करत भारताचा डाव ७८ धावांवर संपुष्टात आणला. इंग्लंडकडून अँडरसन आणि ओव्हर्टन यांना प्रत्येकी तीन, तर रॉबिन्सन आणि करनला प्रत्येकी दोन बळी मिळवता आले.