पाकविरुद्धच्या लढती आधी विराटचा धक्कादायक कबुलीनामा; चांगले असल्याचे भासवण्यासाठी…
क्रीडा

पाकविरुद्धच्या लढती आधी विराटचा धक्कादायक कबुलीनामा; चांगले असल्याचे भासवण्यासाठी…

दुबई: गेली अडीच वर्षे आंतरराष्ट्रीय शतक झालेले नाही… कर्णधारपदही गमावले… आता तर संघातील स्थानच डळमळीत झाले आहे… भारताचा माजी कर्णधार आणि आधुनिक क्रिकेटमधील महान फलंदाज असा लौकिक स्वकर्तृत्वावर मिळवलेल्या विराट कोहली(virat kohli )ची ही सद्यस्थिती. अशा प्रतिकूल परिस्थितीचा परिणाम त्याच्या मानसिक स्वास्थ्यावरही झाला. शनिवारी ही बाब खुल्यादिलाने मान्य करत, ‘मी गेल्या महिनाभरात बॅटला हातही लावला नाही’, असेही त्याने सांगितले. एवढेच नव्हे, तर मनोधैर्य चांगले असल्याचे भासवण्यासाठी खोटा जोशही दाखवल्याचे विराटने कबुल केले.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

एका क्रीडावाहिनीच्या कार्यक्रमात विराटने खऱ्या अर्थाने ‘मोकळा’ संवाद साधला. ‘मी मानसिकदृष्ट्या खचलो होतो आणि आज मी हे कोणत्याही संकोचाशिवाय मान्य करतो. गेल्या दहा वर्षांत असे पहिल्यांदाच झाले की, मी एक महिनाभर बॅटला हातही लावला नाही. त्या मानसिक दुर्बलतेच्या काळात मी उसने अवसानही दाखवले’, असे विराटने कोणताही आडपडदा न ठेवता सांगितले. विराटने इंग्लंड दौऱ्यावर न जाता विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला. एवढेच काय, पण तो वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे दौऱ्यावरही गेला नाही.

‘माझ्यात जोश, धमक आहे असे म्हणत मी स्वतःचीच खोटी समजूत काढत होतो. मात्र, दुसरीकडे शरीर थकले होते. विश्रांती घे, असा आवाज आतून येत होता’, असे विराट म्हणाला. अलीकडेच इंग्लंडच्या वर्ल्ड कप जेतेपदाचा ‘हिरो’ बेन स्टोक्सनेही खेळाडूंच्या मानसिक आरोग्याचा मुद्दा ठळकपणे मांडत आपली मानसिक दुर्बलता खुलेपणाने कथन केली होती. अशा नकारात्मक विचारांना वेळीच थोपवा, अशी सूचनाही यावेळी विराटने केली. ‘मनोधैर्यावर परिणाम होणे, मानसिकदृष्ट्या खचणे हे अगदी सामान्य आहे. मात्र, अशा गोष्टींबाबत आपण खुलेपणाने बोलत नाही. आपल्याला भीती वाटत असते. समाजापुढे मानसिक दुर्बल दिसणे आपल्याला आवडत नाही. मात्र, ही भावना लपविण्यासाठी उसने अवसान आणणे त्यापेक्षाही घातक आहे’, या महत्त्वाच्या मुद्द्याकडेही त्याने लक्ष वेधले.

सन २०१९च्या मोसमात बांगलादेशविरुद्ध (कोलकाता कसोटी) केलेल्या शतकानंतर विराटला आंतरराष्ट्रीय शतक झळकावता आलेले नाही. ‘कणखर मानसिकतेचा खेळाडू, अशी माझी प्रतिमा आहे. त्यात काहीच चुकीचे नाही. मी तसाच आहे; पण प्रत्येकाची एक मर्यादा असते, हे लक्षात घ्यायला हवे. आपण सगळ्यांनी आपल्या व्यक्तिमत्वातील ती सीमारेषा ओळखायला हवी. अन्यथा गोष्टी आपल्या विरोधात जाऊ लागतात’, असे विराटने नमूद केले.

विराटने आयपीएलमधील बेंगळुरू संघाच्या कर्णधारपदावरूनही पायउतार होणे पसंत केले. गेल्या आयपीएलमध्ये तो निष्प्रभ ठरला. त्याने गेल्या आयपीएल मोसमात अवघ्या २२.७३च्या सरासरीने १६ सामन्यांत ३४१ धावा केल्या. ‘या सगळ्या संघर्षाच्या काळाने मला खूप काही शिकवले आहे. हे सगळे धडे उघड करायलाही आधी मला संकोच वाटत होता. मात्र, आता मी माझी ती मनस्थितीही स्वीकारली आहे’, असे विराट म्हणाला.

आज, रविवारी रंगणाऱ्या भारत-पाकिस्तान आशिया कप लढतीद्वारे विराट पुनरागमन करीत असलेला विराट म्हणाला, ‘माझा संघ कोणत्याही परिस्थितीत जिंकलाच पाहिजे, अशा इर्ष्येने मी खेळतो. मध्यंतरी, त्या संघर्षाच्या काळात हे सगळे नैसर्गिकरित्या, सहज होत नव्हते. मला त्यासाठी स्वतःलाच प्रोत्साहन द्यावे लागत होते. माझा टिपेचा जोश, सेलिब्रेशन याबद्दल मला कायम विचारले जाते. हे सगळे माझ्याकडून सहज होते, कारण माझे या खेळावर मनापासून प्रेम आहे. प्रत्येक चेंडूवर मी धावा केल्या पाहिजेत आणि सामन्याच्या प्रत्येक क्षणी मी सर्वस्व पणाला लावून खेळले पाहिजे अशी माझी भावना असते.’