अंतिम ११मध्ये नसतानाही चहल आला गोलंदाजीला; ३ बळीही घेतले
क्रीडा

अंतिम ११मध्ये नसतानाही चहल आला गोलंदाजीला; ३ बळीही घेतले

अंतिम ११मध्ये निवड झालेली नसताना युझवेंद्र चहल गोलंदाजीला आल्याने भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या टी-२०सामन्यात चर्चेचा विषय बनला आहे. त्यामुळे सामन्याला वादाची किनार लागली आहे. फलंदाजीदरम्यान टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जाडेजाच्या हेल्मेटला बॉल लागल्यामुळे तो दुसऱ्या डावात क्षेत्ररक्षणासाठी मैदानात आला नाही. बीसीसीआयची वैद्यकीय टीम जाडेजावर उपचार करत असताना सामनाधिकारी डेव्हीड बून यांनी जाडेजाच्या बदली युजवेंद्र चहलला बदली खेळाडू म्हणून संघात स्थान देण्यास मान्यता दिली असून त्याने ऑस्ट्रेलियाचे महत्वाचे ३ फलंदाज बाद केले आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

परंतू ऑस्ट्रेलियाचा मुख्य प्रशिक्षक जस्टीन लँगरने याला आक्षेप घेतला. सामन्यादरम्यान लँगर डेव्हिड बून यांच्याशी वाद घालत असताना मैदानात दिसला. त्यामुळे जाडेजाच्या ऐवजी बदली खेळाडू म्हणून संघात आलेल्या चहलला गोलंदाजीची संधी कशी मिळाली यावरुन सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये गोंधळ पहायला मिळाला. जाडेजाने फलंदाजीत नाबाद ४४ धावांची खेळीही केली होती.

पण नियमाप्रमाणे चहलला गोलंदाजी करु देणे योग्य आहे. नियम सांगतो की, एखाद्या खेळाडूला सामन्यादरम्यान डोक्यावर मार लागला असेल तर सामनाधिकारी त्या संघाची बदली खेळाडूची विनंती मान्य करु शकतात. पण त्या खेळाडूचा समावेश केल्यामुळे संघाला अतिरिक्त फायदा होणार नाही याची काळजी घेऊनच सामनाधिकारी हा निर्णय घेऊ शकतात. तसेच हा समावेश करताना दुखापतग्रस्त खेळाडू उर्वरित सामन्यात काय भूमिका बजावणार आहे हे लक्षात घेणं गरजेचं आहे.

जाडेजाला झालेली दुखापत पाहता त्याच्या ऐवजी बदली खेळाडू घेणं हे नियमाला धरुन असल्याचं मत समालोचनादरम्यान अनेकांनी व्यक्त केलं. रविंद्र जाडेजा हा डावखुरा अष्टपैलू आहे. फलंदाजी केल्यानंतर जाडेजाचा मधल्या फळीत गोलंदाजीसाठी वापर केला जातो. अशा परिस्थितीत तो संघात नसल्याने त्याच्या जागेवर चहलला गोलंदाजीची संधी देणं हे नियमाला धरुनच असल्याचं मत अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.