बघताय काय रागानं; अर्धशतक केलंय बुमराहनं !
क्रीडा

बघताय काय रागानं; अर्धशतक केलंय बुमराहनं !

सिडनी : ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील सराव साम्यान भारताचा जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराहने एक कमाल केली आहे. परंतु त्यांने ही कमाला गोलंदाजीत नाहीतर फलंदाजीत केली असून एकप्रकारे टीम इंडियाची लाज वाचवली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

सराव सामन्यात एकामागोमाग भारतीय फलंदाज अपयशी ठरत असताना जसप्रीत बुमराहने अर्धशतकी खेळी करत संघाला आधार दिला आहे. विराट कोहली, चेतेश्वर पुजाराच्या अनुपस्थितीत मैदानात उतरलेल्या भारतीय संघाने निराशाजनक खेळी केली. मयांक अग्रवाल अबॉटच्या गोलंदाजीवर २ धावा काढून माघारी परतला. यानंतर पृथ्वी शॉ आणि शुबमन गिल यांनी दुसऱ्या विकेटसाठी ६३ धावांची भागीदारी करत संघाचा डाव सावरला. मात्र यानंतर मधल्या फळीतल्या फलंदाजांनी केलेल्या हाराकिरीमुळे टीम इंडिया संकटात सापडली होती. अखेरीस जसप्रीत बुमराहने अर्धशतकी खेळी करत संघाला आश्वासक धावसंख्येचा टप्पा गाठून दिला.

भारताची युवा जोडी फॉर्मात आलेली आहे असं वाटत असतानाच पृथ्वी शॉ सदरलँडच्या गोलंदाजीवर माघारी परतला, त्याने ४० धावांची खेळी केली. मात्र यानंतर टीम इंडियाच्या डावाला लागलेली गळती थांबलीच नाही. हनुमा विहारी, शुबमन गिल, रहाणे, पंत, साहा, नवदीप सैनी हे फलंदाज एकामागोमाग एक माघारी परतत राहिले. ३ बाद १०२ वरुन टीम इंडियाची अवस्था ९ बाद १२३ अशी झाली. अखेरीस जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांनी अखेरच्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करत संघाची लाज वाचवली.

जसप्रीत बुमराहने विशेषकरुन आक्रमक पवित्रा घेत अर्धशतक झळकावलं. ५७ चेंडूत ६ चौकार आणि २ षटकारांसह त्याने नाबाद ५५ धावा केल्या. सिराजनेही २२ धावांची खेळी करत त्याला चांगली साथ दिली. अखेरीस स्वेप्सनने सिराजला बाद करत टीम इंडियाचा पहिला डाव १९४ धावांवर संपवला. ऑस्ट्रेलियाकडून सेन अबॉट आणि जॅक वाईल्डरमथने प्रत्येकी ३-३ तर कॉनवे, सदरलँड, ग्रीन आणि स्वेप्सन यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला.