बिगुल वाजलं ! राज्यातील १४ हजार २३४ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर
राजकारण

बिगुल वाजलं ! राज्यातील १४ हजार २३४ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर

मुंबई : राज्यातील एकूण १४ हजार २३४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. १५ जानेवारी २०२१ रोजी मतदान; तर १८ जानेवारी २०२१ रोजी मतमोजणी होणार आहे. राज्यांतील एकूण ३४ जिल्ह्यांत या निवडणुका होतील. त्यासाठी आज (ता. ११)पासून आचारसंहिता लागू झाली आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी केली.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

या निवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्रे २३ ते ३० डिसेंबर २०२० या कालावधीत स्वीकारली जातील. त्यांची छाननी ३१ डिसेंबर २०२० रोजी होईल. नामनिर्देशनपत्रे ४ जानेवारी २०२१ पर्यंत मागे घेता येतील व त्याच दिवशी निवडणूक चिन्ह वाटप होईल. मतदान १५ जानेवारी २०२१ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत होईल. मतमोजणी १८ जानेवारी २०२१ रोजी होईल. गडचिरोली जिल्ह्यात फक्त मतदानाची वेळ सकाळी ७.३० ते दुपारी ३ वाजेपर्यंत राहणार आहे.

विधानसभा मतदारसंघाची २५ सप्टेंबर २०२० रोजी अस्तित्वात असलेली मतदार यादी या निवडणुकांसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्यानुसार तयार करण्यात आलेल्या ग्रामपंचायतींच्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या १ डिसेंबर २०२० रोजी प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. त्यावर हरकती व सूचना दाखल करण्यासाठी ७ डिसेंबर २०२० पर्यंतची मुदत देण्यात आली होती. त्यानुसार अंतिम मतदार याद्या १४ डिसेंबर २०२० रोजी प्रसिध्द केल्या जाणार आहेत.

दरम्यान, एप्रिल ते जून २०२० या कालावधीत मुदत संपलेल्या १ हजार ५६६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी ३१ मार्च २०२० रोजी मतदान होणार होते; परंतु कोविड-19 ची परिस्थिती उद्‌भवल्याने १७ मार्च २०२० रोजी हा निवडणूक कार्यक्रम स्थगित करण्यात आला होता. त्यानंतर तो पूर्णपणे रद्द करण्यात आला होता. यासह डिसेंबर २०२० अखेर मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित होणाऱ्या सर्व ग्रामपंचायतींसाठी हा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.