शंभराव्या कसोटीत जो रुटचा आगळावेगळा विक्रम
क्रीडा

शंभराव्या कसोटीत जो रुटचा आगळावेगळा विक्रम

चेन्नई : भारताविरूद्ध सुरू असलेल्या पहिल्या कसोटीत इंग्लंडने मोठी धावसंख्या उभारली आहे. कर्णधार जो रूटने दमदार खेळी केली असून त्याने धडाकेबाज द्विशतक ठोकले. रूटने या सामन्यात एक इतिहास रचला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

आपला १००वा कसोटी सामना खेळणाऱ्या जो रूट याने आपल्या दमदार खेळीच्या जोरावर द्विशतकी मजल मारली. त्याने १९ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने द्विशतक ठोकले. आपल्या १००व्या कसोटी सामन्यात द्विशतक ठोकण्याचा पराक्रम करणारा जो रूट कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील एकमेव आणि पहिला क्रिकेटपटू ठरला आहे.

त्याशिवाय, जो रूटने आणखी दोन विक्रमही केले. चेन्नईच्या कसोटीत जो रूटने कसोटी कारकिर्दीत दहाव्यांदा दीडशतकी मजल मारली आणि विराट कोहलीच्या विक्रमाशी बरोबरी केली. तसंच सलग तिसऱ्यांदा दीडशतकी मजल मारणारा तो सातवा फलंदाज ठरला आहे.

दरम्यान, सामन्याच्या पहिल्या दिवशी डॉम सिबली आणि दुसऱ्या दिवशी अष्टपैलू बेन स्टोक्स यांच्या साथीने जो रूटने याने संघाला मोठ्या धावसंख्येच्या दिशेने नेले. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंग्लंडच्या संघाने ८ बाद ५५५ धावांपर्यंत मजल मारली असून इंग्लंडच्या संघाकडून डाव घोषित करण्यात आलेला नाही.