सचिनला दणका; ते ट्वीट पडले महागात
क्रीडा

सचिनला दणका; ते ट्वीट पडले महागात

मुंबई : माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरला मोठा दणका बसला असून समाजमाध्यमांवरील त्याच्या चाहत्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. अनेक चाहते सचिनने गमावले आहेत. नव्या कृषी कायद्यांविरोधात नवी दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाविषयी सरकारधार्जिणी भूमिका घेतल्याने त्याला हा फटका बसला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

अमेरिकेची विख्यात पॉपगायिका रिहाना तसेच स्वीडनची युवा सामाजिक कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग हिने शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिल्यानंतर सचिनसह भारताचा कर्णधार विराट कोहली, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे यांनी ट्वीट करत सर्वानी एकत्र येण्याची विनंती केली आहे. कोणत्याही राजकीय मुद्यांवर आपले मत न मांडणाऱ्या सचिनने या वेळी मात्र आपल्या ट्वीटने सर्वाचा रोष ओढवून घेतला आहे. मुख्य म्हणजे, आंदोलनाला दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी होऊनही रिहानाच्या ट्वीटनंतरच सचिनला जाग आली का, असा प्रश्नही काही चाहत्यांनी विचारला आहे.

भारताच्या सार्वभौमत्वाशी तडजोड मान्य नाही. बाहेरील शक्ती बघ्याच्या भूमिकेत राहू शकतात, पण हस्तक्षेप करण्याचा त्यांना अधिकार नाही. देशाबद्दलची माहिती देशवासीयांनाच असून त्यांनीच निर्णय घ्यायला हवा. देश म्हणून आपण सर्वानी एकत्र येऊ या, असे ट्वीट सचिनने केले होते. त्यानंतर असंख्य चाहत्यांनी सचिनला खडे बोल सुनावले आहेत.