ICC TEST Ranking : अश्विन बुमराह फायद्यात तर विराटची घसरण
क्रीडा

ICC TEST Ranking : अश्विन बुमराह फायद्यात तर विराटची घसरण

चेन्नई : चेन्नई टेस्टमधल्या पराभवानंतर आयसीसी टेस्टच्या फलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीची घसरण झाली आहे. विराट कोहली पाचव्या क्रमांकावर फेकला गेला आहे. तर भारताविरुद्ध द्विशतक करणारा इंग्लंडचा कर्णधार जो रूट याने दोन स्थानांची उडी घेत तिसरा क्रमांक गाठला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

2017नंतर पहिल्यांदाच जो रूट आयसीसी टेस्ट क्रमवारीत विराटच्या पुढे गेला आहे. पहिल्या क्रमांकावर असलेल्या केन विलियमसनपासून रूट 36 पॉईंट्स लांब आहे. तर स्टीव्ह स्मिथ विलियमसनपासून 8 पॉईंट्स मागे असल्यामुळे तो दुसऱ्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलियाचाच मार्नस लाबुशेन टेस्ट क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर आहे. चेन्नई टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये 91 रन करणारा ऋषभ पंत 13व्या क्रमांकावर कायम आहे. याशिवाय दुसऱ्या इनिंगमध्ये अर्धशतक करणारा शुभमन गिल 7 खेळाडूंना मागे टाकत 40व्या क्रमांकावर पोहोचला आहे.

भारताचा फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन आणि जलदगती गोलंदाज जसप्रित बुमराह यांनी मात्र प्रत्येकी एका क्रमांकाची चढाई करत ते अनुक्रमे सातव्या आणि आठव्या क्रमांकावर विराजमान झाले आहेत. गोलंदाजांच्या यादीत ऑस्ट्रेलियाचा जलदगती गोलंदाज पॅट कमिन्स पहिल्या स्थानावर तर स्टुअर्ट ब्रॉड दुसऱ्या स्थानावर कायम आहेत. मात्र, पहिल्या कसोटीत चांगली गोलंदाजी करणारा जेम्स अँडरसनने तीन स्थानांनी बढती मिळवत तिसऱ्या स्थानावर मजल मारली आहे.