जेम्स अँडरसनचा आणखी एक मोठा विक्रम; घेतले १००० बळी
क्रीडा

जेम्स अँडरसनचा आणखी एक मोठा विक्रम; घेतले १००० बळी

नवी दिल्ली : इंग्लंडचा दिग्गज वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने मंगळवारी झालेल्या काउंटी चॅम्पियनशिप सामन्यात लँकशायरकडून खेळताना १९ धावा देऊन ७ गडी बाद केले. यासह अँडरसनने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १००० बळी पूर्ण केले. अँडरसनने हा सामना केंटविरुद्ध खेळला. २००५ मध्ये अँडी कॅडिक प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १००० बळी मिळविण्यात यशस्वी झाला. आता १६ वर्षानंतर अँडरसनने ही कामगिरी केली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

अँडरसनने आतापर्यंत २६२ प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत आणि ५१ वेळा ५ बळी घेण्याची किमया केली आहे. प्रथम श्रेणीत सर्वाधिक बळींचा विक्रम इंग्लंडचा माजी डावखुरा फिरकीपटू विल्फ्रेड रोड्सच्या नावावर आहे. त्याने ४,२०४ बळी घेतले आहेत. ३८ वर्षीय अँडरसनने कसोटीत ६१७ बळी घेतले आहेत. त्याच्यापुढे भारताचा अनिल कुंबळे (६१९ बळी) आहे. त्यामुळे पुढच्या काही सामन्यात अँडरसन कुंबळेला मागे टाकू शकतो.

मागील महिन्यात अँडरसनने इंग्लंडकडून सर्वाधिक कसोटी सामने खेळण्याचा विक्रम नोंदवला होता. अँडरसनने माजी कर्णधार अ‍ॅलिस्टर कूकला मागे टाकले होते. त्याने आतापर्यंत १६२ कसोटी सामने खेळले आहेत. अँडरसनने १८ वर्षांपूर्वी २००३मध्ये लॉर्ड्स येथे झिम्बाब्वेविरुद्धच्या कसोटी सामन्यात पदार्पण केले होते. अँडरसन शिवनारायण चंद्रपॉल (१६४), राहुल द्रविड (१६४) आणि जॅक कॅलिस (१६६) यांनाही मागे टाकू शकतो. मुथय्या मुरलीधरन (८००), शेन वॉर्न (७०८) आणि अनिल कुंबळे (६१९) या दिग्गज गोलंदाजांनंतर अँडरसन सर्वाधिक कसोटी बळी घेणारा गोलंदाज आहे.