महाराष्ट्र केसरी आप्पालाल शेख काळाच्या पडद्याआड
क्रीडा

महाराष्ट्र केसरी आप्पालाल शेख काळाच्या पडद्याआड

मुंबई : महाराष्ट्र केसरी आप्पालाल शेख (वय ५४) यांचे मधुमेह आणि मूत्रपिंडाच्या विकाराने गुरूवारी सोलापुरातील एका खासगी रूग्णालयात निधन झाले. न्यूझीलंडमधील राष्ट्रकूल स्पर्धेत त्यांनी सुवर्णपदक जिंकले होते.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

लाल मातीत कुस्त्या खेळून लौकिक मिळवेपर्यंत कुस्तीपटूंना संस्था, संघटना, शासन, दानशूर व्यक्तींकडून आर्थिक मदत मिळवून देण्याचे काम शेख यांनी केले. परंतु पैलवान कुस्तीच्या आखाड्यातून बाहेर गेला की एकाकी पडतो. शेख यांच्या बाबतीतही दुर्दैवाने हेच घडले. शारिरिक व्याधी आणि आर्थिक विवंचनेमुळे विपन्नावस्थेत त्यांचा शेवट झाला.

सोलापूरजवळील बोरामणी (ता. दक्षिण सोलापूर) येथील आप्पालाल शेख यांनी १९९३ साली पुण्यातील कुस्ती अधिवेशनात संजय पाटील यांना आस्मान दाखवून महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावला होता. महाराष्ट्र केसरी किताब मिळविणारे त्यांच्या घरातील तिघेजण आहेत. यापूर्वी त्यांचे थोरले बंधू इस्माईल शेख हे १९८० साली खोपोली येथे कुस्ती अधिवेशनात महाराष्ट्र केसरी झाले होते. त्यांचे पुतणे मुन्नालाल शेख यांनी जालना येथे २००१-०२ साली महाराष्ट्र केसरीची गदा पटकावली होती. एकाच घरातून तिघे मल्ल महाराष्ट्र केसरी होण्याचा मान मिळवणारे बोरामणीचे एकमेव शेख कुटुंबीय आहे.

आप्पालाल यांनी आपली मुले अश्फाक, अस्लम आणि गौस्पाक यांना कोल्हापूरला पाठवले होते. तेथे मुलांचा सराव सुरू असतानाच इकडे गावात आप्पालाल यांना मधुमेह बळावला आणि मूत्रपिंडाच्या विकाराने पछाडले. शासनाकडून मिळणारे मानधन तुटपुंजे आणि तेसुध्दा वेळेवर मिळत नसल्यामुळे शेतीवर अवलंबून राहिलेल्या शेख कुटुंबीयांची परवड सुरू झाली. अशा विपन्नावस्थेत काही दानशूर मंडळींनी मदतीचा हात दिला. तर आपल्या पित्याची सेवा करण्यासाठी तिन्ही मुलांना कोल्हापूर सोडावे लागले. यातच तीन महिन्यांपूर्वी आप्पालाल यांच्या पत्नी साथ सोडून देवाघरी गेल्यामुळे ते आणखी खचले. यातच आजार बळावला आणि आप्पालाल यांचा शेवट झाला. बोरामणी गावात त्यांचे पार्थिव दफन करण्यात आले.