काबूल विमानतळावर मोठा स्फोट; अनेकजण मृत्यूमुखी
बातमी विदेश

काबूल विमानतळावर मोठा स्फोट; अनेकजण मृत्यूमुखी

काबूल : अफगाणिस्तानात तालिबाननं सत्ता प्रस्थापित केल्यानंतर दहशतीचं वातावरण कायम आहे. अशात अफगाणिस्तानातील काबूल विमानतळाबाहेर दोन आत्मघातकी हल्ले झाले आहेत. या हल्ल्याची खात्री पेंटागन प्रवक्त्यांनी केली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार दोन हल्ल्यात १३ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. त्याचबरोबर तीन अमेरिकन सैनिकांसह १५ जण जखमी झाल्याची माहिती आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि ब्रिटेननं काबूल विमानतळावर दहशतवादी हल्ल्याची भीती व्यक्त केली होती. त्याचबरोबर आपल्या देशातील नागरिकांना विमानतळापासून दूर राहण्याच्या सूचनाही दिल्या होत्या.

काबूल विमानतळाच्या एबी गेटच्या बाहेर आत्मघातकी हल्ला झाला. हल्लेखोर गोळीबार करत आला आणि स्वत:ला स्फोटकांनी उडवलं. विमानतळाच्या या गेटवर ब्रिटनचे सैनिक तैनात होते. तर दुसरा आत्मघातकी हल्ला हॉटेलबाहेर झाला. पाश्चिमात्य देशातील सैनिकांना लक्ष्य करत असल्याचं दिसत आहे, असं अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. दरम्यान, आत्मघातकी हल्ल्यापूर्वी काबूल एअरपोर्टवर इटलीच्या एका विमानावर गोळीबार करण्यात आला होता. या विमानात अफगाणिस्तानातील १०० शरणार्थी होते.