फ्लाईंग सिख महान धावपटू मिल्खा सिंग यांचे निधन
क्रीडा

फ्लाईंग सिख महान धावपटू मिल्खा सिंग यांचे निधन

नवी दिल्ली : भारताचे महान माजी धावपटू आणि फ्लाईंग सिख अशी ओळख असलेले मिल्खा सिंग यांचे ९१व्या वर्षी निधन झाले आहे. मोहालीतील एका रुग्णालयात मिल्खा सिंग यांना दाखल करण्यात आले होते. कोरोनाची चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना बुधवारी जनरल आयसीयूत ठेवण्यात आले. त्यानंतर मिल्खा सिंग यांना अचानक ताप आला. शिवाय त्यांच्या ऑक्सिजन पातळीतही घसरण झाली.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

गेल्या महिन्यात मिल्खा सिंग यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. यानंतर त्यांना मोहालीच्या फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले. आठवडाभर उपचारानंतर त्यांना घरीही सोडण्यात आले होते. घरी परतल्यावर त्यांची ऑक्सिजन पातळी खालावली, त्यानंतर त्यांना पीजीआयएमईआर चंदीगडमध्ये दाखल केले गेले.

मिल्खा सिंग यांचा जन्म २० नोव्हेबर १९२९ रोजी पाकिस्तानातील पंजाबमध्ये झाला. त्यावेळेस भारत-पाकिस्तान फाळणी झाली नव्हती. १९५८च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील २०० आणि ४०० मीटर प्रकारात त्यांनी सुवर्णपदक जिंकले होते. अशी कामगिरी करणारे ते एकमेव भारतीय खेळाडू ठरले. मिल्खा सिंग यांनी दक्षिण आफ्रिकेच्या मॅल्कम स्पेन्सला हरवून ४६.६ सेकंदात ही शर्यत पूर्ण केली. तर २०० मीटर शर्यतीत त्यांनी पाकिस्तानच्या अब्दुल खालिकचा पराभव केला. मिल्खा यांनी ही धाव केवळ २१.६सेकंदात पूर्ण केली. १९६२मधील जकार्ता एशियन गेम्समध्ये मिल्खा सिंग यांनी ४०० मीटर आणि ४x४०० मीटर रिलेमध्ये सुवर्णपदके जिंकली आहेत. १९५९मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

पत्नीचे कोरोनामुळे निधन
काही दिवसांपूर्वी मिल्खा सिंग यांच्या पत्नी निर्मल मिल्खा सिंग यांचे करोनामुळे निधन झाले होते. त्या ८५ वर्षांच्या होत्या. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मिल्खा सिंग पत्नीच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहू शकले नाहीत. कोरोना प्रोटोकॉल अंतर्गत निर्मल सिंह यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते.