आयसीसीने सुरु केलेला पहिलाच पुरस्कार ऋषभ पंतला
क्रीडा

आयसीसीने सुरु केलेला पहिलाच पुरस्कार ऋषभ पंतला

चेन्नई : २०२१ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद आयसीसीने महिन्यातील सर्वोत्तम खेळाडू असा नवा पुरस्कार सुरू केला आणि पहिल्याच पुरस्काराचा मानकरी भारताचा धडाकेबाज फलंदाज ऋषभ पंत ठरला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

जानेवारी महिन्यात भारतीय संघ ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका खेळत होता. या मालिकेत ऋषभ पंतने दोन डावात संस्मरणीय खेळी केल्या. तिसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने दिलेल्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना त्याने ९७ धावांची धडाकेबाज खेळी होती. तर चौथ्या सामन्यात त्याने नाबाद ८९ धावा करत भारतीय संघाला विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला. त्याच्या याच खेळीमुळे त्याला जानेवारी २०२१मधील सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

ऋषभ पंतने जानेवारी महिन्यात ४ डावांत २४५ धावा केल्या. ८१.६६च्या सरासरीने त्याने धावा कुटल्या. त्याने ४ झेल टिपले. तसेच एका सामन्यात सामनावीराचा किताबही मिळवला. त्यामुळे आयसीसीच्या मतदान समितीने आणि चाहत्यांनी मिळून या पुरस्कारासाठी ऋषभ पंतची निवड केली आहे.

आयसीसीकडून दर महिन्याला पुरूष आणि स्त्री अशा दोन्ही प्रकारात महिन्यातील ३ सर्वोत्तम क्रिकेटपटूंची नामांकनं दिली जातात. खेळाडूचा मैदानावरील पराक्रम, वावर आणि महिन्यात केलेले विक्रम या साऱ्याचा विचार करून हे तीन खेळाडू नामांकित केली जातात. एकूण मतदानाच्या टक्केवारीपैकी आयसीसीच्या मतदान समितीकडे ९० टक्के तर चाहत्यांकडे १० टक्के मतदानाचे अधिकार असतात. आयसीसीच्या अधिकृत संकेतस्थळावर चाहत्यांना आपलं मत नोंदवता येतं. विजेत्या खेळाडूंचं नावं दर महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी जाहीर करण्यात येतं.