पहिल्या दिवशी भारताची त्रिशतकी मजल; कोहली, गिल अपयशी
क्रीडा

पहिल्या दिवशी भारताची त्रिशतकी मजल; कोहली, गिल अपयशी

चेन्नई : इंग्लंडविरूद्धच्या दुसऱ्या कसोटीत पहिल्या दिवसअखेर भारतीय संघाने ६ बाद ३०० धावांपर्यंत मजल मारली. सलामीवीर रोहित शर्माने धडाकेबाज दीडशतक ठोकलं. शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा आणि कर्णधार विराट कोहली हे वरच्या फळीतील फलंदाज स्वस्तात बाद झाले. पण रोहितला उपकर्णधार अजिंक्य रहाणेने साथ दिल्यामुळे भारताला मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करता आली.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. शुबमन गिल बाद झाल्यावर रोहितने पुजाराच्या साथीने डाव पुढे नेला. पण पुजारा २१ धावांवर बाद झाला. विराटला आज खातेही उघडता आले नाही. त्यानंतर रोहित आणि अजिंक्य रहाणे या दोघांनी १५२ धावांची भागीदारी केली. यांच्या भागीदारी दरम्यान रोहितने चेन्नईच्या मैदानावर आपलं पहिलं शतक ठोकलं.

दीडशतकी खेळी केल्यानंतर २३१ चेंडूत १६१ धावा काढून रोहित बाद झाला. त्याने १८ चौकार आणि दोन षटकार लगावले. फिरकीपटू जॅक लीचच्या गोलंदाजीवर स्वीप शॉट खेळून रोहित बाद झाला. रोहित माघारी परतल्यानंतर भारताने झटपट गडी गमावले. आधी अजिंक्य रहाणे अर्धशतकी खेळी करून त्रिफळाचीत झाला. त्याने ९ चौकारांसह १४९ चेंडूत ६७ धावा केल्या. रविचंद्रन अश्विनदेखील १३ धावांवर तंबूत परतला. त्यानंतर दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऋषभ पंत (३३*) आणि अक्षर पटेल (५*) यांनी खेळपट्टीवर सांभाळली आणि संघाला तीनशेचा आकडा गाठून दिला.