विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत सौरभ चौधरीला कांस्यपदक
क्रीडा

विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत सौरभ चौधरीला कांस्यपदक

नवी दिल्ली : भारताच्या सौरभ चौधरीने आयएसएसएफ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत पुरुषांच्या १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात कांस्यपदक कमावून भारताच्या पदकांचे खाते उघडले आहे. १९ वर्षीय सौरभने अंतिम फेरीत २२० आणि पात्रता फेरीत ५८१ गुण मिळवले. १७९.३ गुण मिळवणाऱ्या अभिषेक वर्माला अंतिम फेरीत पाचव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. त्याने पात्रता फेरीत ५८१ गुण मिळवले होते.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूलच्या अंतिम फेरीस पात्र ठरलेल्या मनू भाकर (१३७.३ गुण) आणि यशस्विनी सिंग देस्वाल (११७.१ गुण) यांना अनुक्रमे सातव्या आणि आठव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. पात्रता फेरीत मनूला ५७७ गुण आणि यशस्विनीला ५७८ गुण मिळाले. ५७२ गुण मिळवणारी राही सरनोबत अंतिम फेरी गाठण्यात अपयशी ठरली.

भारताच्या ऐश्वर्य प्रताप सिंग तोमरने पुरुषांच्या १० मीटर एअर रायफल प्रकाराच्या अंतिम फेरीत सातवे स्थान मिळवले, तर महिलांना पात्रता फेरी ओलांडण्यात अपयश आले. महिलांमध्ये अंजूम मुदगिल, अपूर्वी चंडेला आणि इलाव्हेनिल व्हालारिव्हान अंतिम फेरी गाठण्यात अपयशी ठरल्या.