INDvsAUS : दुसऱ्या कसोटीसाठी असा असेल भारतीय संघ
क्रीडा

INDvsAUS : दुसऱ्या कसोटीसाठी असा असेल भारतीय संघ

अॅडिलेड : भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन दिग्गज संघात कसोटी मालिका सुरु असून पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. त्यामुळे २६ डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात भारतीय संघात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. उर्वरीत तीन कसोटी सामन्यांसाठी कर्णधार विराट कोहली आणि प्रमुख वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या अनुपस्थितीत भारतीय संघाला मैदानात उतरावे लागणार आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

अशा परिस्थितीत अंतिम ११ मध्ये कोणाची वर्णी लागणार ? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघामध्ये कर्णधार अजिंक्य रहाणे, मयांक अगरवाल, पुजारा, अश्निन, बुमराह आणि यादव यांचं अंतिम ११ मधील स्थान अबाधित आहे. अंतिम ११ संघामध्ये पाच खेळाडूंबाबत संघ व्यवस्थापन मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघात मोठे बदल दिसण्याची शक्यता आहे.

खराब फॉर्ममध्ये असणाऱ्या पृथ्वी शॉ आणि वृद्धीमान साहाला अंतिम ११ तून डच्चू मिळणे जवळपास निश्चित आहे. पृथ्वी शॉऐवजी युवा शुबमन गिल याला संधी मिळण्याची शक्यता आहे. तर साहाच्या जागी पंतला संघात स्थान देण्यात येऊ शकतं. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत के. एल. राहुलला चौथ्या स्थानवर पसंती दिली जाऊ शकते. दुसऱ्या कसोटी सामन्यात अष्टपैलू रविंद्र जाडेजाला संधी मिळण्याची शक्यता आहे. पहिल्या कसोटी सामन्यात अपयशी ठरलेल्या हनुमा विहारीच्या जागी जाडेजाला संधी दिली जाऊ शकते. शिवाय शमीच्या जागी सिराजला संधी मिळू शकते.

दुसऱ्या कसोटीसाठी संभाव्य भारतीय संघ
अजिंक्य रहाणे(कर्णधार), ऋषभ पंत(यष्टीरक्षक), मयांक अगरवाल, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, के. एल. राहुल. रविंद्र जाडेजा, आर. अश्विन, जसप्रीत बुमराह, उमेश यादव, मोहम्मद सिराज