सचिनच्या मुलाची जोरदार धुलाई, एका षटकात सुर्यकुमार यादवने कुटल्या एवढ्या धावा
क्रीडा

सचिनच्या मुलाची जोरदार धुलाई, एका षटकात सुर्यकुमार यादवने कुटल्या एवढ्या धावा

मुंबई : सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरची सूर्यकुमार यादवने जोरदार धुलाई केली असून एकाच षटकात तब्बल २१ धावा चोपल्या आहेत. अर्जुनच्या एका षटकात ३ चौकार आणि एक षटकार लगावत त्याने २१ धावा केल्या आहेत. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या सूर्यकुमारने चौफेर फटकेबाजी केली आहे. आगामी सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेसाठी तयारी म्हणून मुंबई क्रिकेट असोसिएशनतर्फे आयोजित सराव सामन्यांमध्ये सूर्यकुमारने फटकेबाजी करत शतक झळकावलं आहे. मुंबई ब विरुद्ध मुंबई ड या सामन्यांत सूर्यकुमारने ४७ चेंडूत १२० धावांची खेळी केली.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

एकाच षटकात २१ धावा दिल्यानंतरही अर्जुन तेंडुलकरने नंतर चांगलं पुनरागमन केलं. त्याने आपला ४ षटकांचा कोटा ३३ धावा देत एक बळी घेऊन संपवला. सूर्यकुमारने आपल्या शतकी खेळीत १० चौकार आणि ३ षटकार लगावले. मुंबई ब संघाने २० षटकांत २१३ धावांचा डोंगर उभा केला.

रणजी क्रिकेटमध्ये वर्चस्व गाजवणाऱ्या मुंबई क्रिकेट संघाची सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेतली कामगिरी चांगली नाही. आतापर्यंत मुंबईचा संघ एकदाही या स्पर्धेची अंतिम फेरी गाठू शकलेला नाही. त्यामुळे नवीन वर्षात क्रिकेटचा हंगाम पुन्हा सुरु होत असताना एमसीएने आपल्या खेळाडूंसाठी सराव सामन्याचं आयोजन करत तगडा संघ स्पर्धेसाठी उतरवण्याचं ठरवलं आहे. दरम्यान, सूर्यकुमार यादव मुंबई ब संघाचं नेतृत्व करत आहे. तर, यशस्वी जैस्वालकडे मुंबई ‘ड’ संघाचं नेतृत्व देण्यात आलं असून सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुनही याच संघातून खेळत आहे.