तीनवेळा विश्वविजेत्या ठरलेल्या ऑस्ट्रेलियाला पराभूत करत भारत उपांत्यफेरीत
क्रीडा

तीनवेळा विश्वविजेत्या ठरलेल्या ऑस्ट्रेलियाला पराभूत करत भारत उपांत्यफेरीत

टोकियो : भारतीय महिला हॉकी संघाने ऑस्ट्रेलियन संघाला १-० च्या फरकाने पराभूत करुन उपांत्यफेरीत प्रवेश केला आहे. भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला पराभूत करण्याआधीच आयर्लंड आणि दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करण्याची किमया साधली होती. ४१ वर्षांच्या इतिहासात प्रथमच भारतीय महिला संघाने ऑलिम्पिकमध्ये इतकी चमकदार कामगिरी केली आहे. तीन वेळा विश्वविजेता ठरलेल्या ऑस्ट्रेलियन संघाला पराभूत करण्याचा भीमपराक्रम भारतीय महिलांना करुन दाखवत मोठ्या थाटात उपांत्यफेरीत प्रवेश केला.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

खेळ सुरु झाल्यानंतर पहिल्याच क्वार्टरमध्ये भारताच्या शर्मिला देवीला दुखापत झाल्याने मैदानाबाहेर जावं लागलं. पहिल्या क्वार्टरमध्ये दोन्ही संघांना एकही गोल करता आला नाही. दुसऱ्या क्वार्टरमध्ये मात्र भारतीय महिला संघाने आपलं खातं उघडलं.

जागतिक क्रमवारीमध्ये दुसऱ्या स्थानी असणाऱ्या ऑस्ट्रेलियन महिला संघाची बचाव फळी भेदत भारताच्या गुरजीत कौरने पेनल्टी शॉर्टवर गोल केला. या गोलसहीत पहिल्या हाफमध्ये भारताने १-० ची आघाडी मिळवली. भारताने ही आघाडी कायम ठेवत उपांत्यफेरीतील प्रवेश निश्चित केला.