देशात कोरोनाचा धोका कायम; २४ तासांत ४० हजारांहून अधिक कोरोनाबाधितांची नोंद
कोरोना इम्पॅक्ट बातमी

देशात कोरोनाचा धोका कायम; २४ तासांत ४० हजारांहून अधिक कोरोनाबाधितांची नोंद

नवी दिल्ली : देशातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी संकट मात्र टळलेले नाही. मागील सहा दिवसांपासून ४० हजाराहून अधिक कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. सोमवारी सकाळी आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत ४० हजार १३४ नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर ४२२ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

केरळमध्ये सर्वाधिक २०,७२८ नवीन बाधित आढळून आले आहेत. देशभरात गेल्या २४ तासांमध्ये ३६,९४६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. देशात केरळमध्ये कोविड रुग्णांच्या संख्येत कोणतीही घट होताना दिसत नाही आहे. सहाव्या दिवशीही केरळमध्ये २० हजारांहून अधिक कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. २७ जुलैपासून केरळमध्ये करोनाची १ लाख २८ हजार ३७३ प्रकरणे नोंदली गेली आहेत.

आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, १ ऑगस्टपर्यंत देशभरात कोरोना लसीचे ४७ कोटी २२ लाख डोस देण्यात आले आहेत. रविवारी १७ लाख लसी देण्यात आल्या. त्याचबरोबर, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या मते, आतापर्यंत ४६ कोटी ९६ लाख कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. रविवारी सुमारे १४ लाख कोरोना नमुने चाचण्या करण्यात आल्या, ज्यांचा सकारात्मकता दर ३ टक्क्यांपेक्षा कमी आहे.