भारत आणि नेपाळचा सामनाही पावसामुळे रद्द झाला तर काय होणार?
क्रीडा

भारत आणि नेपाळचा सामनाही पावसामुळे रद्द झाला तर काय होणार?

पल्लिकल : भारताचा पाकिस्तानबरोबरचा सामना पावसामुळे रद्द झाला. भारताचे सर्व सामने श्रीलंकेत होणार आहेत आणि तिथे पावसाचे वातावरण आहे. त्यामुळे जसा पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात पाऊस पडला तसा जर भारत आणि नेपाळ सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होऊ शकते, याचे समीकरण आता समोर आले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

भारत आणि पाकिस्तानचा सामना पावसामुळे रद्द झाला. त्यामुळे दोन्ही संघांना समान गुण दिले, पण पाकिस्तानचा मात्र चांगलाच फायदा झाला. कारण पाकिस्तानचा संघ आता सुपर – ४ मध्ये पोहोचला आहे. पण भारत मात्र अजून सुपर – ४ मध्ये पोहोचू शकलेला नाही. पण आता जर नेपाळबरोबरचा सामना पण पावसामुळे रद्द झाला तर नेमकं काय होणार, हा प्रश्न भारतीय चाहत्यांना सतावत असेल. जर आता नेपाळने भारताचा पराभव केला तर आशिया चषकात मोठा फेरबदल हो शकतो. कारण त्यामुळे भारताचे आव्हान संपुष्टात येऊ शकते. पण जर या सामन्यात पाऊस पडला तर मात्र दोन्ही संघांना समान १ गुण मिळेल. सध्याच्या घडीला भारतीीय संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे, कारण त्यांच्या खात्यात एक गुण आहे. दुसरीकडे नेपाळचा संघ तिसऱ्या स्थानावर आहे आणि त्यांच्या नावावर एकही गुण नाही. त्यामुळे हा सामान जर पावसामुळे रद्द झाला तर भारताचे दोन आणि नेपाळचे १ गुण होईल. यानुसार भारताचा संघ हा सुपर – ४ मध्ये दाखल होऊ शकतो.

पावसाच्या लपंडावात झालेल्या आशिया कप वनडे क्रिकेट स्पर्धेतील पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताच्या आघाडीच्या फलंदाजांनी शनिवारी नांगी टाकली. भारतीय फलंदाजांचा कायमची डोकेदुखी असलेला शाहीन शाह आफ्रिदी आणि हारीस रौफ या डावऱ्या-उजव्या वेगवान गोलंदाजांनी भारताची ४ बाद ६६ अशी अवस्था केली. मात्र, ईशान किशन आणि हार्दिक पंड्याने पाचव्या विकेटसाठी १३८ धावा जोडल्यामुळे भारतास २६६ धावांची मजल मारता आली.

भारतीय फलंदाजांच्या अपयशाने; तसेच शाहीनच्या भेदकतेने सुरू झालेल्या या रंगतदार लढतीतील दुसऱ्या डावावर पावसाने पाणी फिरवले. पावसाने भारताच्या डावात किमान तीनदा व्यत्यय आणला होता, त्यामुळे ५० मिनिटे वाया गेली होती, तरीही एकही षटक कमी झाले नव्हते. ग्राउंड्समननी मैदान सुकवले, पंचांनी पाहणी केली. मात्र, त्यानंतर जोरदार पाऊस आला आणि अखेर भारतीय वेळेनुसार साडेनऊच्या सुमारास लढत रद्द करण्याचा निर्णय घेणे भाग पडले.