मास्क न घातल्याने थेट राष्ट्राध्यक्षांना दंड
बातमी विदेश

मास्क न घातल्याने थेट राष्ट्राध्यक्षांना दंड

ब्राझील : कोरोनाचे नियम न पाळल्याने अनेकांना दंड भरावा लागल्याचे समोर आले आहे. परंतु, थेट ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जैर बोल्सोनारो यांना कोरोना प्रतिबंधाचे नियम मोडल्यामुळे १०० डॉलर्सचा दंड भरावा लागला असल्याचे समोर आले आहे. त्यांनी आपल्या समर्थकांच्या रॅलीत सहभागी झाल्यावर मास्क घातला नव्हता तसंच मोठी गर्दी जमवली होती. साओ पाऊलो भागांमध्ये ही कारवाई करण्यात आली.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

बोल्सोनारो यांनी रॅलीमध्ये सहभागी होताना मास्क न घातल्याने राज्याच्या कोरोना प्रतिबंधक नियमांचं उल्लंघन झाल्याने त्यांच्यावर ही कारवाई झाली. पुढच्या वर्षी फेरनिवडणुका घेण्यासाठी बोल्सोनारो यांनी ही रॅली आयोजित केली होती. मात्र, त्यांनी याबद्दलची कोणतीही पूर्वसूचना साओ पाऊलो राज्याचे राज्यपाल आणि त्यांचे राजकीय शत्रू जोआओ डोरिया यांना दिलेली नव्हती. त्यामुळे डोरिया म्हणाले की जर त्यांनी राज्याचे करोना प्रतिबंधाचे नियम पाळले नाहीत तर त्यांना दंड हा भरावाच लागेल.

बोल्सोनारो यांचे डोरिया तसंच इतर राज्यपालांसोबत करोना नियमांची पायमल्ली केल्याबाबत वारंवार खटके उडत असतात. बोल्सोनारो यांनी कायमच घरी राहणे, मास्क वापरणे अशा कोरोना प्रतिबंधक नियमांवर टीका केली आहे. मात्र ते क्लोरोक्विन, हायड्रोक्लोरोक्विन अशा औषधांच्या वापराला पाठिंबा देत आहेत. मात्र, अभ्यासातून हे समोर आलं आहे की यांचा कोरोनाच्या उपचारात काहीही उपयोग होत नाही.