बालाजी तांबे काळाच्या पडद्याआड; मुख्यमंत्र्यांकडून श्रद्धांजली
पुणे बातमी

बालाजी तांबे काळाच्या पडद्याआड; मुख्यमंत्र्यांकडून श्रद्धांजली

मुंबई : आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांचे ८१ व्या वर्षी निधन झाले. गेल्या आठवड्यात प्रकृती खालावल्याने त्यांना उपचारासाठी पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचार सुरु असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. मंगळवारी संध्याकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी वीणा, मुलगा सुनिल, संजय आणि सूना व नातवंडे असा परिवार आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

कोण होते बालाजी तांबे?
बालाजी तांबे हे आयुर्वेद, योग व संगीतोपचार या विषयांतील तज्ज्ञ तसेच पुणे जिल्ह्यातील कार्ला येथे असलेल्या आत्मसंतुलन व्हिलेजचे संस्थापक होते. तब्बल पाच दशकं त्यांनी आयुर्वेद, अध्यात्म आणि संगीतोपचार यांचा प्रचार व प्रसार केला. समाजातील अनेक घटकांना त्यांनी आयुर्वेदाशी जोडले. आयुर्वेद केवळ राज्य किंवा देशभरापुरतं मर्यादित न ठेवला त्यांनी जगभरात प्रसार केला आणि त्याचं महत्व पटवून दिलं.

बालाजी तांबे यांनी लिहिलेली पुस्तके
– आत्मरामायण (गुजराती भाषेत)
– आयुर्वेद उवाच. भाग १, २.(मराठी)
– आयुर्वेदीय गर्भसंस्कार (मराठी, गुजराती, इंग्रजी)
– आयुर्वेदिक घरगुती औषधे (मराठी व इंग्रजी)
– चक्र सुदर्शन (मराठी)
– मंत्र आरोग्याचा
– मंत्र जीवनाचा
– वातव्याधी
– श्री गीता योग – शोध ब्रह्मविद्येचा (इंग्रजीत Peacock Feathers) (१८ भाग). (प्रकाशनाधीन)
– श्री रामविश्वपंचायतन (मराठी)
– संतुलन क्रियायोग (मराठी)
– स्त्रीआरोग्य
– स्वास्थ्याचे २१ मंत्र. (भाग एकाहून अधिक.)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची तांबे यांना श्रद्धांजली
आयुर्वेदाचार्य डॉ. बालाजी तांबे यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. डॉ. तांबे यांच्या निधनामुळे आयुर्वेद आणि रोजच्या जगण्यात आहार-विहार आणि विचारांच्या संतुलनाबाबत मार्गदर्शन करणारे आरोग्यपूजक व्यक्तिमत्व काळाने हिरावून नेले आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.