फडणवीसांचा तर्क विसंगत थयथयाट
ब्लॉग

फडणवीसांचा तर्क विसंगत थयथयाट

असे म्हणतात… बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले..! परंतु विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची मात्र नेमकी या विरोधी भूमिका आहे…! मुंबई पोलीस गुप्तवार्ता विभागाचे सचिन वाझे यांना तातडीने अटक करण्याची मागणी फडणवीस विधानसभेत राणाभीमदेवी थाटात करत असून, त्यांचा या करिता थयथयाट चालल्याचे दिसते आहे. दुसरीकडे मात्र ज्या सचिन वाझे यांनी रिपब्लिक टीव्हीच्या टीआरपी घोटाळ्याचे आरोप असलेल्या अर्णब गोस्वामीला अटक केली होती, त्या प्रकरणात अर्णब गोस्वामीला जामीन मंजूर करतांना सर्वोच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांच्या कारवाई बाबत भाष्य केले होते. त्या कॉमेंटवर त्याच वेळी विविध मते देखील प्रतिबिंबित झाली. परंतु, ते लक्षात न घेता न्यायालयाने मुंबई पोलिसांवर अर्णब गोस्वामीच्या अटकेवर केलेले ताशेरे उद्घोषित करून, त्यामुळे मुंबई पोलिसांचे थोबाड काळे झाले? असे ही निंदनीय आरोप केले..! मात्र न्यायालयाची कॉमेंट फडणविसांनीच जरी ग्राह्य मानली तर असेच समजले पाहिजे की मुंबई पोलिसांनी घाई गर्दीत निष्पाप व्यक्ति वा पुरेशी कायदेशीर काळजी न घेता घाईने कार्यवाही करू नये व जर कार्यवाई केली तर न्यायालयीनप्रसंगी ताशेरे देखील ओढते, मग हे माहीत असूनही मा फडणविसांचे मात्र कळते पण वळत नाही असे झाले. मग निव्वळ तुम्ही म्हणता म्हणून चौकशी होण्या अगोदरच अटक करावी हा अट्टहास का..? कारण एकीकडे कायदेशीर नियमांची पायमल्ली झाल्यास न्यायालयाने मुंबई पोलिसांचे वाभाडे काढले हे देखील आपणच स्पष्ट करत आहात.. मग आपल्या स्वतःच्याच दोन भूमिकांमध्ये विरोधाभास व विसंगती का..?

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

फडणविसांना नेमके काय सांगायचे वा साध्य करायचे आहे हे त्यांनाच समजेनासे झाले आहे.. कारण, त्यांचे करकीर्दीतील त्यांच्या ठायी असलेले अनुभवातून त्यांनी स्वतःच पूर्वगृहदुषीतपणे चौकशी प्रकरणांकडे पाहणे हा मा फडणविसांचा दोष आहे, तो राज्य सरकारचा दोष नाही. किंबहुना केंद्र सरकार च्या अखत्यारीतील एनआयए देखील याची चौकशी करीत असल्याचे देखील फडणविसांनी विसरू नये, व नाहक आदळ आपट करू नये..!

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या बंगल्याजवळ आढळलेली एका स्कॉर्पिओ गाडी मध्ये काही जिलेटीन कांड्या मिळाल्या व ज्या गाडीची फक्त पोलीस चौकशीच नाही तर केंद्र सरकारच्या अखत्यारीतील एनआयए मार्फत देखील चौकशी चालू आहे, त्याच्या मालकाचा (श्री मनसुख हिरेन) झालेला संशयस्पद मृत्यू वर विधानसभेत गदारोळ झाला. या विषयाचे गांभीर्य पाहता, वस्तुस्थितीची सखोल चौकशी होणे व सत्य बाहेर येणे निश्चितच गरजेचे आहे, निव्वळ ते उद्योगपती हे मुकेश अंबानी आहेत, म्हणून नाही, तर इतर कोणाही नागरिकाच्या घराजवळ अशी संशयास्पद गाडी आढळली असती, तरीही ते तेवढेच गांभीऱ्याचे होते.. हिरेन यांच्या पत्नीच्या पत्रात शेवटच्या वाक्यात सचिन वाझे यांचे विषयी व्यक्त केलेल्या संशयाविषयी सखोल चौकशी होणे बाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट संकेत दिले असून वाझे यांची तातडीने बदली देखील केली आहे. ही बाब देखील लक्षात घेणे गरजेचे आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनावर विश्वास व्यक्त करून त्यांना पुरेसा अवधी दिला पाहिजे. तसेच, या प्रकरणी दुसरी बाब देखील लक्षात घेतली पाहिजे की, अंबानी यांच्या बंगल्यावर हेलीपॅड करिता परवानगी देखील त्यांना हवी आहे. या अनुषंगाने कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील या विषयी शंका व्यक्त केली आहे व आरोप देखील केला आहे.

विरोधीपक्ष नेते मा देवेंद्र फडणवीस यांचा एकंदर मागील सत्तेचा व विरोधी पक्षातील कार्यकाल लक्षात घेता त्यांच्या विसंगत थयथयाट विषयी त्यांचा हेतु स्पष्ट होतो. देवेंद्र फडणवीस हे तत्कालीन मुख्यमंत्री व गृहमंत्री असतांना न्यायमूर्ती जस्टीस लोया यांचा नागपूर मध्ये संशयास्पद मृत्यू झाला. त्यानंतर कॉ. गोविंद पानसरे यांचा खून, कोपर्डी येथील दुर्दैवी घटना, भीमा कोरेगाव दंगल प्रकरण, अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण, नागपूर मधील वाढती गुंडगिरी, शेतकरी धर्मा पाटील यांची आत्महत्या… हे सर्व फडणवीस सरकारच्याच् कारकिर्दीत घडले व राज्यात गुन्हेगारी प्रमाण दर सर्वाधिक झाले. याचे विस्मरण देखील तत्कालीन मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांना झाले काय..? हा देखील योगायोग आहे का(?) की वरील कारकीर्दीतील काही गुन्हे वा गुन्हेगारांचा फोलपणाचा पर्दाफाश देखील होत आहे, आणि म्हणून मा फडणवीसांचा त्रागा होत आहे..? राज्यात बालके व महीलांवरील गुन्हेगारीचे प्रमाण महाविकास आघाडी सरकार आल्यापासून जवळपास ३० टक्क्यांनी कमी झाले..! ही वस्तुस्थिती नजरेआड करू शकत नाही…या पोलिसांच्या कृती विषयी बोलतांना राज्यातील गुन्हेगारीचे प्रमाण कमी झाल्याची नोंद तरी जागरूक विरोधीपक्ष नेत्यांच्या ठायी पाहीजे आता कोणाचे थोबाड नव्हे तर तोंड काळे झाले म्हणायचे? पण आम्ही तसे म्हणणार नाही, कारण आमचे ते संस्कार नाहीत… राज्यातील गृहखात्याच्या प्रत्यक्ष आकडेवारीवर देवेंद्र फडणवीस यांनी आत्मचिंतन करणे गरजेचे आहे….!

फडणवीस यांनी विधानसभेत प्रचंड आवेशपूर्ण भाषण केलं. पण असे भाषण आणि आरोप करण्याची त्यांची ही पहिली वेळ नव्हती. याच सभागृहात, ते २०१४ पूर्वी विरोधी पक्षनेते असताना त्यांनी मोठ्या आवेशात विजयकुमार गावित यांच्यावर घोटाळा केल्याच आरोप करुन सभागृह दणाणून सोडलं होतं…मात्र पुढे विजयकुमार गावीत भाजप आमदार झाले. याच सभागृहात, त्यांनी सिंचन घोटाळ्यावर जबरदस्त फटकेबाजी करत अजित पवार आणि सुनिल तटकरे यांच्यावर आरोप केले होते. तसंच त्यांनी या घोटाळ्याचे गाडीभर पुरावे असल्याचे देखील सांगितले होते. मात्र स्वतः मुख्यमंत्री पदाची व गृहमंत्री पदाची संपूर्ण ५ वर्षांची कारकिर्दीत साधा एफआयआर दाखल करू शकले नाहीत, ना कोणतेही आरोप सिद्ध करू शकले..!

याच सभागृहात, नारायण राणेंवरील आरोपांची आणि दाखल झालेल्या गुन्ह्यांची जंत्रीच सभागृहात वाचून दाखवली… पुढे काय तर त्यांना राज्यसभा मिळवून दिली..! प्रवीण दरेकरांच्या मुंबई बँक घोटाळा पुरावे असलेले पेपर दाखवत कारवाईची मागणी केली होती, मात्र पुढे काय तर स्वतः मुख्यमंत्री झाल्यावर प्रवीण दरेकरांना भाजप मध्ये घेऊन विधानपरिषदेचे आमदार केले इतकंच नाही तर मुख्यमंत्री असतांना शिक्षकांची वेतन बँक खाती मुंबई बँकेत वळवली परंतु न्यायालयाने फटकारल्यावर खाती मागे घेतली. याच सभागृहात, विरोधी पक्षनेता असतांना कृपाशंकर सिंग यांच्या घोटाळ्याची कागदे नाचवली पण स्वतः मुख्यमंत्री झाल्यावर त्याच कृपाशंकर विरुद्ध ही काही सिद्ध करू शकले नाही व चौकशी करायची नाही असे प्रतिज्ञापत्र न्यायालयाला दिले.

खोटेनाटे आरोप करून, दिशाभूल करून, खोटी आश्वासने देऊन सत्तेवर आलेल्या भाजप सरकारची पाच वर्षांची संपूर्ण टर्म व स्वतः मुख्यमंत्री आणि गृहमंत्री राहिलेल्या फडणवीसांची कारकीर्द लोकांनी पाहिलेली आहे… पूर्वी विरोधीपक्षात असतांना केलेल्या एकही आरोप सिद्ध करू शकले नाही वा कोणत्याही आरोपाबाबत चौकशी वा कारवाई देखील केलेली नाही, हीच सत्य परिस्थिती आहे.. त्या मुळे एका गावातील लबाड मुलगा जसा कोल्हा आला रे आला असे सांगून गावकऱ्यांना फसविण्यात आनंद व यश मानत असतो असाच प्रकार विरोधीपक्ष नेते असलेल्या फडणविसांचे बाबतीत झाला आहे.. त्यामुळे त्यांचा अभिनिवेष व त्रागा हा निव्वळ तर्क-विसंगत थयथयाट असून, जनता आता याला भुलणारी नाही..! कारण संघाच्या पठडीत वाढलेल्या भाजपतर नेत्यांची जुनी सवय व संस्कार पहिले की हे दिसून येते की, लाल बहादूर शास्त्री यांचा मृत्यू असो वा सुभाषचंद्र बोस असो, संजय गांधी असो वा राजीव गांधीचेवरील बॉम्ब स्फोट हल्ला असो, कुंभाडखोरीने व उथळपणाने नाहक संशय निर्माण करणे व त्यातून आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करणे हेच दिसून आले आहे…!

लेखक – गोपाळदादा तिवारी
लेखक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते आहेत.