शरद पवार : राज्याला पुरोगामित्वाच्या दिशेने नेणारा राजकारणातील जाणता नेता
ब्लॉग

शरद पवार : राज्याला पुरोगामित्वाच्या दिशेने नेणारा राजकारणातील जाणता नेता

राज्याच्या राजकारणातील जाणता नेता आणि विकासाचा ध्यास घेतलेला अभ्यासु नेता म्हणून ओळख असलेल्या शरद पवार यांचा आज वाढदिवस. इतकेच नव्हे तर, आपली राजकीय कारकीर्द पणाला लावून राज्याचे व्यावहारिकदृष्ट्या पुरोगामित्व जोपासणाऱ्यामध्ये शरद पवार यांचे नावही तितक्याच आदराने घ्यावे लागेल. या पुरोगामित्वचा वसा त्यांनी आजही तितक्याच धैर्याने पुढे चालू ठेवला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा पाईक म्हणून त्यांनी महाराष्ट्राला ‘पुरोगामी राज्य करण्यासाठी आपली सत्ता राबविली. दि. १८ जुलै १९७८ ते दि. १६ फेब्रुवारी १९८०, दि. २५ जून १९८८ ते ४ मार्च १९९०, दि.४ मार्च १९९० ते दि. २५ जून १९९१ आणि दि. ६ मार्च १९९३ ते दि. १३ मार्च १ ९९ ५ असे चारवेळा शरद पवारांनी मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राचे नेतृत्व केले. मात्र शरद पवारांचा हा पुरोगामित्वाच्या दिशेने हा प्रवास खूप आधीच सुरु झाला होता.

त्यावेळी देशात संयुक्त महाराष्ट्र चळवळ जोर धरू लागली होती. चळवळीच्या निमित्ताने शरद पवार आचार्य प्र. के. अत्रे, क्रांतिसिंह नाना पाटील, साथी एस. एम. जोशी, केशवराव जेधे, शंकरराव मोरे, कॉम्रेड डांगे, उद्धव पाटील या नेत्यांच्या संपर्कात आले. त्यांच्या ते वैचारिक वाद संवादाचा प्रभाव त्यांच्यावर अगदी लहान वयातच पडत गेला. त्यातूनच त्यांच्या आचारविचारात पुरोगामित्वाचे बीज अंकुरले गेले. पुढे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर अनेक निर्णयात त्याचे पडसाद आपणाला दिसून येतात.

मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीत शरद पवारांनी घेतलेल्या निर्णयांमधून त्यांच्या पुरोगामी विचारांची चुणूक आजही दिसून येते. स्त्रियांना सत्तेत सहभाग देण्याची घटना, मराठवाडा विद्यापीठाला डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याचा क्रांतिकारी निर्णय, भूकंपग्रस्तांसाठी मदत व पुनर्वसन, भटक्या विमुक्त समाजासाठी आश्रमशाळांची उभारणी, दलितांना सत्तेत सहभागी करून घेणे, मंडल आयोगाची अंमलबजावणी असे अनेक महत्त्वाचे निर्णय शरद पवारांनी निधड्या छातीने घेतले.

महाराष्ट्राच्या पुरोगामी पाऊलखुणा या पुस्तकात ज्येष्ठ लेखक साहेबराव खंदारे यांनी शरद पवार यांच्याबाबत  पुरोगामी विचारांचा उल्लेख केला आहे. साहेबराव खंदारे म्हणतात, ”समाजव्यवस्थेतील उपेक्षित, दुर्लक्षित समाजघटकांना आणि स्त्रीवर्गाला सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीयदृष्ट्या मुख्य प्रवाहात आणणे, तसेच त्यांचे मागासलेपण दूर करून, व्यवस्थेत समता निर्माण करणे ही पुरोगामित्वाची मूळ भूमिका शरद पवारांनी आपल्या विचार – व्यवहारात सातत्याने जपलेली दिसते. म्हणूनच त्यांनी सतत स्त्रियांना सत्तेत सहभागी करून घेण्याचे धोरण अवलंबिले आहे.”

आपल्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात राज्यात पुरोगामित्त्वाचे कृतीशील राजकारण करत शरद पवार यांनी सुधारणावाद आणि राष्ट्रीय एकात्मतेच्या दिशेने पावले उचलल्याचे दिसून येते. कुटुंबाच्या स्थावर जंगम मालमत्तेत पुरुषांबरोबर स्त्रियांना बरोबरीचा हक्क आणि स्त्रीला कुटुंबप्रमुख म्हणून मान्यता देणारे धोरणसुद्धा शरद पवारांनीच सर्वप्रथम अंमलात आणले. तसेच पोलीसदलात महिलांची भरती करून घेण्याचा निर्णयही त्यांनीच घेतला. दलित समाजातील नेत्यांना स्वत: बरोबरच घेऊन त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करून, सत्तेत सहभागी करून घेण्याची ताकद आजही केवळ शरद पवारांकडे असल्याचे दिसून येते.

सामाजिक क्षेत्रासोबातच त्यांनी कृषी, सांस्कृतिक, शेक्षणिक क्षेत्राचा विकासाच्या दृष्टीने निर्णय घेतल्याचे दिसून येते. १९७८ मध्ये शरद पवार यांनी मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतली असताना मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरणाचा मुद्दा चांगलाच पेटला होता. विरोधकांनी त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. मात्र अशा प्रतिकूल परिस्थितीतही आपली राजकीय कारकीर्द पणाला लावून पवारांनी केवळ पुरोगामी विचारप्रवाहातून सत्तेचा उपयोग समतेच्या जागरणासाठी करत मराठवाडा विद्यापीठ नामांतराचा निर्णय घेतला. मात्र मराठवाड्यातील जनता या निर्णयाविरोधात पेटून उठली आणि सरकारला हा निर्णय तहकूब करावा लागला. त्यानंतर १९८८ मध्ये शरद पवार पुन्हा मुख्यमंत्री पदी विराजमान झाल्यानंर त्यांनी सावधपणे मराठवाड्यातल्या प्रत्येक गावच्या सरपंचापासून सामान्य कार्यकर्त्यांपर्यंत सर्वांना विश्वासात घेत काँग्रेस मंत्रिमंडळाने विद्यापीठाचा नामविस्तार घडवला.

राजकारणात त्यांच्याइतकी जहरी टीका कोणावरही झाली नसेल. बाहेरचे विरोधक व पक्षांतर्गत छुपे शत्रू त्यांच्या वाट्याला जितके आले, तितके क्वचितच दुसऱ्या नेत्याच्या वाटेला आले असतील. पण पवार त्यांच्यासमोर कधी नमले नाहीत. ‘ अविश्वासू व्यक्तिमत्त्व ‘ म्हणून त्यांच्यावर नेहमीच टीकाटिप्पणी केली जाते, पण जेव्हा जेव्हा महाराष्ट्राच्या व देशाच्या राजकारणात आणीबाणीचा प्रसंग उभा राहतो त्यावेळी शरद पवारांसारखा मुसद्दी, अभ्यासू, आणि समाजाला एकत्रितपणे पुढे नेणाऱ्या नेत्याचीच आठवण येते. अशा वेळी त्यांच्याशी सल्लामसलत केल्याशिवाय किंवा त्यांना सोबत घेतल्याशिवाय राजकारणाचा गाडा पुढे सरकतच नाही असेच म्हणावे लागेल. विकासात्मक राजकारण, पुरोगामी विचारांचे समाजकारण आणि भविष्यातील प्रगतीचा वेध घेणारी अभ्यासूवृत्ती या गुणांमुळे शरद पवरांना महाराष्ट्रात आजही लोकमान्यता आहे.