कोरोना संसर्ग रोखण्यासाठी पुणे महापालिकेचा मोठा निर्णय; वाचा सविस्तर
कोरोना इम्पॅक्ट

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी पुणे महापालिकेचा मोठा निर्णय; वाचा सविस्तर

पुणे : राज्यातील कोरोना रुग्णांचे वाढते प्रमाण पाहता राज्यातील काही शहरांमध्ये पुन्हा कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात रात्री 11 ते पहाटे सहापर्यंत पुन्हा संचारबंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बैठकीत हा निर्णय झाला. पुणे महानगरपालिका क्षेत्रासह पुणे जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू झाले आहेत. पुणे महानगरपालिका क्षेत्रात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी करण्यात आलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

यावेळी बोलताना ते म्हणाले की, ”या अंतर्गत जिल्ह्यात रात्री ११ ते पहाटे सहावाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. पुणे शहर, आणि पिंपरी चिंचवडसह जिल्ह्यातील शाळा येत्या २८ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. शहरात रात्री ११ ते पहाटे सहादरम्यान संचारबंदी लागू राहील. पुण्यामध्ये हॉटेल सुरू ठेवण्यासाठी रात्री ११ पर्यंतच परवानगी देण्यात आली आहे. तसेच, शहरातील कोचिंग क्लासेस बंद राहतील. मात्र अभ्यासिका सुरू राहतील. तसेच महाविद्यालयेही बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याबरोबरच लग्नसोहळ्यासाठी केवळ २०० जणांना उपस्थितीची परवानगी देण्यात आली आहे.

विवाह सोहळ्यास किंवा समारंभास होणारी गर्दी लक्षात घेता, यावरही कडक निर्बंध लावण्याचा निर्णय घेण्यात आला असून लग्न/समारंभास केवळ 200 जणांची उपस्थितीच असावी लागेल, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. हाही निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला आहे. पोलिसांच्या परवानगीशिवाय कुठल्याही लग्नाला परवानगी नाही, असंही सांगण्यात आलं आहे.

तर पुणे शहरासह जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस 28 फेब्रुवारी 2021 पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय पालकमंत्री अजित पवार यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. याबाबतचे सविस्तर आदेश लवकरच जारी केली जातील. उच्च शिक्षण घेणारे वर्ग अर्ध्या क्षमतेने सुरू ठेवण्यास परवानगी असणार आहे. तर कंटेन्मेंट झोनमध्ये वावर मर्यादित करण्यासाठी पत्रे लावले जातील. तसेच संचारबंदी लागू न करता नियंत्रित संचारावर भर दिला जाईल. या नियमांची उद्यापासून अंमलबजावणी केली जाणार आहे.

तर विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या एनआयव्हीमध्ये चाचण्या बंद आहेत. जीनोम सिक्वेन्सींग सुरू असल्याने चाचण्या बंद आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून ग्रामीण भागांत कोव्हीड केअर सेंटर सुरू करण्यात येणार आहेत.ससुन रुग्णालयामध्ये कोरोना चाचण्या सुरू करण्यात येणार आहेत. उद्या हॉटेल असोसिएशनबरोबर बैठक होणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे पोलिसांच्या परवानगीशिवाय कार्यक्रम घेता येणार नाहीत. लग्नासाठी पोलिसांचे ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक असेल. पोलिसांना २ तासांत परवानगी द्यावी लागणार आहे.

दरम्यान पुणे शहर, जिल्हा आणि आसपासच्या भागातील कोरोनाचे रुग्ण वाढत चालले आहेत. त्या पार्श्वभूमीवर प्रादुर्भाव रोखण्यासाठी कडक उपाययोजना करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या. ज्या भागात रुग्ण अधिक वाढत आहेत, अशा ‘हॉटस्पॉट’ प्रभावी नियोजन करून आवश्यकता भासल्यास पुन्हा प्रतिबंधित क्षेत्रे निर्माण करावेत. तसेच, आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत घरोघर भेटी देऊन सुपर स्प्रेडर, आयएलआय व सारी रुग्णांचे सर्वेक्षण केले जाणार आहे. खाजगी वैद्यकीय व्यावसायिक यांच्याकडे येणाऱ्या ताप सदृश्य रुग्णांची स्वाब तपासणी करणे बंधनकारक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संपर्क शोध मोहीम अधिक प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना पवार यांनी केल्या. यासोबतच सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन पवार यांनी बैठकीमध्ये केले.