कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी मुंबई महापालिका अलर्ट मोडवर; कारवाईचा धडाका सुरु
कोरोना इम्पॅक्ट

कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी मुंबई महापालिका अलर्ट मोडवर; कारवाईचा धडाका सुरु

मुंबई : कोरोनाबाधित वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका अलर्ट झाली आहे. डिसेंबर-जानेवारी महिन्यात दर दिवसाला होणारी कोरोनाची रुग्णवाढ ही नियंत्रणात आली होती. जानेवारीमध्ये दर दिवसाला साडे तीनशे-चारशेच्या जवळपास वाढत असलेली रुग्णसंख्या अचानक फेब्रुवारीच्या दुसऱ्या तिसऱ्या आठवड्यात 800 पर्यंत वाढती आहे. यामुळे मुंबई महापालिकेने रुग्णसंख्या नियंत्रणात यावी म्हणून नियम आणखी कडक केले असून मास्क न वापरल्यास दंडात्मक कारवाई अधिक कडक केली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मुंबईमध्ये मागील आठवड्याभरापासून कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढताना पाहायला मिळत आहे. या रुग्णवाढीच्या कारणांचा विचार केला तर त्यातील एक कारण लोकल सर्वसामान्यांसाठी सुरू करणे हे असू शकतं, असं मत कोरोना टास्क फोर्सचे डॉ. शशांक जोशी यांनी ‘एबीपी माझा’शी बोलताना व्यक्त केलं. लोकल मर्यादित वेळेत जरी सर्वसामान्य लोकांसाठी सुरू करण्यात आली असली तरी प्रवाशी संख्या ही 20 लाखाहून 35 लाखापर्यंत पोहोचली आणि दुसरीकडे रुग्णसंख्या सुद्धा वाढत चालली आहे. ही वस्तुस्थिती असून मुंबईतील कोरोना रुग्णवाढी मागे अनेक कारणांमध्ये लोकलसेवा सर्वांसाठी सुरू करणे हे सुद्धा एक कारण असल्याच डॉ. शशांक जोशी यांनी सांगितलं.

या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने गेल्या दोन दिवसांपासून रेस्टॉरन्ट्स बार आणि हॉटेल्सवर कारवाई करायला सुरवात केली आहे. काल रात्रीच्या सुमारास वांद्रे आणि खार परिसरातल्या पाच रेस्टॉरन्ट, बार आणि पबवर कारवाई करण्यात आली आहे. यात एकूण 650 जणांवर महापालिकेकडून 1 लाख 40 हजारांचा दंड वसूल केला आहे. तर काही कॅफे अॅण्ड बारवर 188, 269 कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. त्याचसोबत वांद्र्यातील आयरिश हाऊस, खार स्टेशनजवळील क्वॉर्टर पिलर, थ्री वाईस मंकी आणि यू-टर्न लाऊन्जमध्ये देखील महापालिकेकडून तपासणी करण्यात आली. ज्यात मोठ्या प्रमाणात सोशल डिस्टन्सिंग आणि विना मास्क असलेले ग्राहक आढळले होते. त्यामुळे त्यांच्यावर देखील महापालिकेकडून दंडात्मक कारवाई केली गेली आहे.

तर वांद्र्यातील145 कॅफे अॅण्ड बार व्यवस्थापनावर संसर्गजन्य रोग प्रतिबंधात्मक कायद्यांतर्गत वांद्रे पोलीस ठाण्यात एच वॉर्डच्या आरोग्य खात्यातर्फे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, मुंबईत मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांची संख्या वाढते आहे. त्यामुळे पालिकेकडूनही वाढत्या रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी ठिकठिकाणी प्रतिबंधात्मक कारवाई सुरु असल्याचं बघायला मिळत आहे. जोपर्यंत रुग्णसंख्या आटोक्यात येत नाही तोपर्यंत कारवाई सुरुच राहणार असल्याचं महापालिकेकडून सांगण्यात आलं आहे.