‘पॅन्डेमिक’ शब्दाला यंदाचा ‘वर्ड ऑफ द इयर’ चा मान
कोरोना इम्पॅक्ट

‘पॅन्डेमिक’ शब्दाला यंदाचा ‘वर्ड ऑफ द इयर’ चा मान

न्यूयॉर्क : गेल्या वर्षभरापासून जगभरात कोरोना महामारीने थैमान घातले आहे. महामारीचा प्रादुर्भावाला सुरवात झाल्यापासून जगभरात एक शब्द सारखाच कानावर पडत आहे, तो म्हणजे पॅन्डेमिक. मार्च महिन्यानंतर कोरोना महामारीशी संबधित पॅन्डेमिक या शब्दाच्या वापरात इंटरनेटवर करण्यात आलेल्या सर्चमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. या पार्श्वभूमीवर जगातील दोन प्रमुख डिक्शनरींनी ‘पॅन्डेमिक’ या शब्दाला ‘वर्ड ऑफ द इयर’ म्हणून घोषित केलं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

पॅन्डेमिक हा शब्द लॅटिन आणि ग्रीक भाषेच्या मिश्रणातून आलेला आहे. पॅन म्हणजे सर्वांसाठी आणि डेमोस म्हणजे लोक वा लोकसंख्या होय. पहिल्यांदाच जगातील दोन प्रमुख डिक्शनरी कंपन्यांनी, मेरियम-बेवस्टर आणि डिक्शनरी डॉट कॉमने एकाच शब्दाला म्हणजे पॅन्डेमिकला यावर्षीचा सर्वाधिक वापरलेला शब्द म्हणजे ‘वर्ड ऑफ द इयर’ मान दिला आहे. जगातील प्रमुख डिक्शनरीतर्फे दरवर्षी सर्वाधिक वापरण्यात येणारा किंवा इंटरनेटवर सर्वाधिक सर्च करण्यात येणारा शब्द जाहीर केला जातो.

डिक्शनरी डॉट कॉमचे वरिष्ठ संपादक जॉन केली यांच्या म्हणण्यानुसार, पॅन्डेमिक हा या वर्षी सर्वाधिक शोधण्यात आलेला शब्द आहे. 11 मार्च रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनाला महामारी घोषित केल्यानंतर इंटरनेटवर पॅन्डेमिक या शब्दाचा सर्च 13,500 पटीनं वाढला. या वर्षी जगातील प्रत्येकाच्या तोंडात रुळलेल्या पॅन्डेमिक या शब्दाला डिक्शनरी डॉट कॉमने या वर्षीचा सर्वाधिक वापरलेला शब्द अर्थात ‘वर्ड ऑफ द इयर’ चा मान दिला आहे. तसेच, त्यानंतर प्रत्येक महिन्याला याच्या सर्चमध्ये एक हजार पटीनं वाढ झाल्याचं दिसून आलंय.”

तर, मेरियम-बेवस्टर डिक्शनरीच्या मते, जगात कोरोनाच्या प्रादुर्भाव वाढत चालल्याने यासंबंधीची माहिती लोकांनी इंटरनेटवर शोधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पॅन्डेमिक शब्दाचा सर्वाधिक सर्च करण्यात आल्याचं दिसून आलंय. जागतिक आरोग्य संघटनेनं 11 मार्च रोजी कोरोनाला महामारी घोषित केल्यानंतर 2019 सालच्या त्याच दिवसाच्या तुलनेत 115,806% टक्क्यांनी पॅन्डेमिक शब्दाचा सर्च वाढला होता.