मंदिरात तोकडे कपडे घालून येऊ नये; शिर्डीतील साई मंदिर संस्थांचे आवाहन
बातमी महाराष्ट्र

मंदिरात तोकडे कपडे घालून येऊ नये; शिर्डीतील साई मंदिर संस्थांचे आवाहन

अहमदनगर : लॉकडाऊननंतर राज्यातील सर्व धर्मियांची प्रार्थनास्थळं सुरु झाली आहेत. यामध्ये शिर्डीतील साईबाबांचे मंदिरदेखील दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे. जागृत देवस्थान असल्यामुळे हे मंदिर खुले झाल्यापासून साईभक्तांची येथे मोठी गर्दी होत आहे. मंदिर प्रशासनाने सर्व कोरोना प्रतिबंधक नियम पाळून दर्शनाची व्यवस्था केलेली आहे. मात्र आता साईबाबा मंदिर प्रशासनाने नुकताच एक निर्णय घेतला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मंदिरात येताना भक्तगण दर्शनासाठी तोकडे कपडे घालून येत आहेत, अशी तक्रार यापूर्वी काही भक्तांनी साईबाबा संस्थानकडे केली होती. याच तक्रारीची दखल घेत, मंदीर प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. साईबाबा संस्थानचे कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांनी दिलेल्या महितीनुसार, ”फक्त महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण भारतात जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या शिर्डीतील साईमंदिरात ‘तोकडे कपडे घालून येऊ नये. भक्तांनी भारतीय पेहरावात साईमंदिरात यावं,’ असं आवाहन साईबाबा संस्थानकडून करण्यात आलं आहे.

त्याचबरोबर, मंदिरात भारतीय पेहरावात यावं, अशा आशयाचे फलकदेखील साईबाबा मंदिर परिसरात लावण्यात आले आहेत. “साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी अनेक जण तोकडे कपडे घालून येत असल्याचे निरीक्षणात आले आहे. तीर्थस्थळी येताना भारतीय पेहरावात यावं,” असं यांनी सांगितलं.

तथापि, साई संस्थानच्या या आवाहनाला सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी निशेध केला आहे. ‘मंदिरातील पुजारी अर्धनग्न असतात. मग भक्तांच्या कपड्यांबाबत निर्बंध का?, असा सवाल त्यांनी केला आहे. तसेच, अशा आशयाचे फलक लावणे म्हणजे हा भारतीय संविधानाचा अवमान असल्याचे त्या म्हणाल्या. “शिर्डीच्या साईबाबा मंदिरात भक्तगण देश-विदेशातून येतात. हे भक्त वेगवेगळ्या जातीधर्माचे असतात. शिर्डी संस्थानने मंदिर परिसरात भक्तांनी सभ्य पोशाख घालून यावं या आशयाचा एक बोर्ड लावला आहे.

तसेच, भारत देशात संविधान आहे. संविधानाने अभिव्यक्ती आणि व्यक्तिस्वातंत्र्य दिलं आहे. त्यामुळे कुणी काय बोलाव?, काय बोलू नये हा?, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. हा संविधानाचा आपमान आहे,” असे त्या म्हणाल्या. तसेच, मंदिरामध्ये कशा पद्दतीचे कपडे घालायला पाहिजेत याचे भान भक्तांना आहे. भक्तांची श्रद्धा कपड्यांवरुन ठरवू शकत नाहीत. श्रद्धा महत्वाची असते, असं वक्तव्य त्यांनी साई संस्थानला उद्देशून केलं.