नव्या कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचे आरोग्य यंत्रणेला महत्त्वाचे निर्देश
कोरोना इम्पॅक्ट

नव्या कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचे आरोग्य यंत्रणेला महत्त्वाचे निर्देश

मुंबई : ब्रिटन आणि इतर काही देशांमध्ये कोरोना विषाणूचा नवीन प्रकार आढळून आल्यानंतर भारतातही प्रशासकीय यंत्रणा हायअलर्टवर आल्या आहेत. या सुपरस्प्रेडर कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला जागरूक राहण्याचे आवाहन केले आहे. राज्यात सर्व प्रशासकीय यंत्रणांनी सावध राहतानाच चाचण्यांचे प्रमाण वाढवावे, मास्कचा वापर बंधनकारक करावा, पुढचा धोका लक्षात घेऊन जागरुक राहण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मुख्यमंत्री ठाकरे यांनी आज सर्व विभागीय आयुक्त, सर्व जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त आणि जिल्ह्याचे पोलीस अधिकारी यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. यावेळी बोलतान मुख्यमंत्री म्हणाले की, ”कोरोना विषाणूला प्रतिबंध करण्यात आतापर्यंत सर्वच यंत्रणांनी खूप मेहनत घेतली आहे. अलगीकरण-विलगीकरणाच्या सुविधा सज्ज ठेवाव्यात. हा विषाणू ज्या वेगाने पसरतो त्या प्रमाणात उपचारांची आणि चाचण्यांची क्षमता ठेवा, आता दुसऱ्या विषाणूच्या पार्श्वभूमीवर गाफील राहून चालणार नाही. अधिक मेहनत घ्यावी लागेल. ऑक्सीजन, व्हेंटिलेटर्स, औषधे यांचा पुरेसा साठा करून ठेवावा.

तसेच, स्थानिक पातळीवर कोरोना विषाणूमध्ये जनुकीय बदल होतात का याचा अभ्यास टास्क फोर्समधील डॉक्टरांनी करावा. नवीन प्रकारच्या कोरोनामुळे उपचाराची पद्धत याबाबत टास्कफोर्सने अभ्यास करावा. तसेच,‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ अभियानांतर्गत सहव्याधी (कोमॉरबिड) असलेल्या लोकांचा राज्यभरातील डेटा (माहिती) आरोग्य विभागाकडे आहे. स्थानिक आरोग्य यंत्रणेने अशा सहव्याधी रुग्णांशी संपर्क करावा, त्यांच्याशी संवाद साधून त्यांची आरोग्यविषयक काळजी घेतानाच त्यांना सतर्क करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

उन्हाळा-पावसाळ्यातील साथीच्या आजारांवर आपण नियंत्रण मिळवू शकलो. आता हिवाळ्यात सर्दी-पडसे, ताप-खोकला असे साथीचे आजार वाढले आहे. हे लक्षात घेऊन कोरोना चाचण्यांवर अधिक भर द्यावा. तसेच, लसीकरण करणारी यंत्रणा, पहिल्या टप्प्यात ज्यांना लस द्यावयाची आहे त्या आरोग्य कर्मचाऱ्यांचा डेटा संकलित करून तो पाठवणे, शीतगृहांची व्यवस्था, प्रशिक्षण आदी गोष्टींचा त्यांनी आढावा घेतला.

त्यासाठी राज्यात असलेल्या कोरोना चाचणीच्या प्रयोगशाळांचा पूर्ण क्षमतेने वापर करावा. आरटीपीसीआर चाचण्या वाढवाव्यात, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी कोरोना लसीकरणाच्या तयारीचा आढावाही घेतला. यात जिल्हा टास्कफोर्सने लसीकरणासंदर्भात बैठका घेण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण कमी करण्यावर भर देतानाच नॉन कोविड रुग्णांकडेही लक्ष द्यावे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.