शिक्षकानेच केला विनयभंग; अभिनेत्रीकडून धक्कादायक खुलासा
मनोरंजन

शिक्षकानेच केला विनयभंग; अभिनेत्रीकडून धक्कादायक खुलासा

मुंबई : बिग बॉसमधील अभिनेत्री कविता कौशिकने तिच्या आयुष्यातील एक सिक्रेट जाहीरपणे सांगितलं आहे. लहानपणी शिक्षकांनीच माझा विनयभंग केला असा धक्कादायक खुलासा कविताने केला आहे. ‘बिग बॉस’च्या घरात अलिकेडच झालेल्या एका टास्कमध्ये कविताने हा खुलासा केला आहे. ‘मी लहान असताना एका व्यक्तीने माझा विनयभंग केला होता. ती व्यक्ती दुसरी-तिसरी कोणी नसून माझे ट्युशनचे शिक्षकच होते, असे तिने म्हटले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

‘या घटनेविषयी मी माझ्या घरी सांगितलं. मात्र, माझ्या बोलण्यावर कोणी विश्वास ठेवला नाही’, असं कविताने या शोमध्ये सांगितलं आहे. “मी ११ वर्षांची होते आणि माझं गणित फार कच्चं होतं. त्यामुळे माझ्यासाठी गणित शिकवण्यासाठी एका शिक्षकाची नेमणूक केली होती. या शिक्षकांचं वय जवळपास ६५ वर्षांपेक्षा जास्त होते. एकदा ते संध्याकाळी माझी शिकवणी घ्यायला घरी आले. त्यावेळी माझ्या आई-वडिलांना बाहेर जायचं होतं. आई-वडील घरातून गेल्यानंतर या वयस्क शिक्षकाने माझ्याशी अश्लील भाषेत बोलण्यास सुरुवात केली. इतकंच नाही तर त्यांनी माझा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला”, असं कविता म्हणाली.

कविताने पुढे सांगितले की, “पुढे काही अघटित घडण्यापूर्वी मी मोठ्याने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. मी रडायला लागले आणि हा घडलेला प्रकार मी माझ्या घरातल्यांना सांगेन अशी धमकी दिली. त्यावर सांग, तुझ्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही असं त्यांनी मला सांगितलं आणि ते निघून गेले. त्यानंतर मी आईला घडलेला सगळा प्रकार सांगितला पण तिने माझ्यावर विश्वास ठेवला नाही. मला गणित शिकायचं नाही त्यामुळे मी हे सगळं करते असं तिला वाटलं.”

दरम्यान, कविता कौशिक सध्या ‘बिग बॉस १४’ मध्ये सहभागी झाली असून अनेकदा तिच्या टास्क खेळण्याच्या पद्धतीमुळे ती चर्चेत असते. छोट्या पडद्यावरील वादग्रस्त पण तितकाच गाजलेला शो म्हणजे बिग बॉस आहे. यंदा या शोचं १४ वं पर्व असून अगदी पहिल्या दिवसापासून हा कार्यक्रम चर्चेत आहे.