गुडन्यूज! कोरोनाची लस आली; फायझर आणि बायोएनटेकच्या कोरोना लशीला युके सरकारची मंजुरी
कोरोना इम्पॅक्ट

गुडन्यूज! कोरोनाची लस आली; फायझर आणि बायोएनटेकच्या कोरोना लशीला युके सरकारची मंजुरी

लंडन : गेल्या वर्षभरापासून संपूर्ण जग ज्या गोष्टीची आतुरतेने वाट पाहत आहेत ती कोरोनाची लस आली आहे. युनायटेड किंगडमने फायझर आणि बायोएनटेकच्या कोरोना लशीला मंजुरी दिली आहे. दरम्यान, जगभरात कोरोनाच्या रुग्णसंख्येनं 6.4 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. ब्रिटनमध्ये आतापर्यंत कोरोनामुळे 16 लाखांपेक्षा जास्त लोक प्रभावित झाले आहेत तर 59 हजार लोकांचा यामुळे मृत्यू झाला आहे. फायझरच्या या लसीला मंजुरी मिळाल्याने जगभरातील लोकांच्या अशा पल्लवित झाल्या आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

काही दिवसांपूर्वीच फायझर कंपनीने घोषणा केली होती, की त्यांना लॅबमध्ये COVID-19 अर्थात कोरोनावरील एक अशी लस तयार करण्यात यश आले आहे, जी कोरोनाविरोधात 96% प्रभावी ठरली आहे. अमेरिका आणि यूरोपीय संघाच्या निर्णयाने फायझर आणि बायोएनटेकच्या कोरोना लशीला मंजुरी देणारा युनायटेड किंगडम पश्चिमेकडील पहिला देश बनला आहे. जर्मनीची बायोफार्मास्यूटिकल कंपनी बायोएनटेक आणि तिची अमेरिकन सहकारी कंपनी फायझरने युरोपिय संघासमोर कालच लशीच्या रजिस्ट्रेशनसाठी औपचारिक अर्ज केला होता. ही लस पुढील आठवड्यापासून इंग्लंडमध्ये उपलब्ध होईल.

अनेक लसी या अंतिम टप्प्यात असून त्या मंजुरीच्या प्रतिक्षेत आहेत. त्यामुळे ब्रिटनने फायझर आणि बायोएनटेक लसीच्या वापराला मंजुरी देऊन लसीला मंजुरी देणारा युनायटेड किंगडम पश्चिमेकडील पहिला देश बनला आहे. ब्रिटनमध्ये मंजुरी मिळालेली लस ही 96%प्रभावी असल्याचं सांगितलं जातंय. ही लस आता पुढच्या आठवड्यापासून सर्वसामान्यांना मिळणार आहे.

या लसीचा वापर सर्वप्रथम उच्च प्राथमिकता असलेल्या लोकांवर आणि रुग्णांवर केला जाणार असल्याचं ब्रिटनच्या प्रशासनानं स्पष्ट केलं आहे. ब्रिटनने आपल्या 2 कोटी लोकसंख्येसाठी प्रत्येकी दोन डोस असे 4 कोटी डोसची ऑर्डर केली आहे. यातील 1 कोटी डोस येत्या काहीच दिवसात येणार आहेत आणि बाकीचे डोस त्यानंतर येतील अशी माहिती ब्रिटनच्या प्रशासनानं दिली आहे. त्याचबरोबर फायझर आणि बायोएनटेकच्या या लसीची साठवणूक -70C या तापमानात करावी लागणार आहे.