दिग्दर्शिका सुमित्रा भावे काळाच्या पडद्याआड
मनोरंजन

दिग्दर्शिका सुमित्रा भावे काळाच्या पडद्याआड

पुणे : प्रसिद्ध दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचं आज (ता. १९) सकाळी कॅन्सरशी लढा देत असताना पुण्यात निधन झालं. त्या मागील काही दिवसांपासून आजारी होत्या. त्यांनी पुण्यातल्या सह्याद्री रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्या ७८ वर्षांच्या होत्या. सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर या जोडीने अनेक प्रतिभावान चित्रपट बनवले. ज्यांना देशविदेशात पुरस्कारांनी गौरवण्यात आलं.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

सुमित्रा भावे यांनी सुनील सुकथनकर यांच्या सोबत दोघी हा चित्रपट बनवला. या चित्रपटाला महाराष्ट्र सरकारचा चित्रपट पुरस्कार मिळाला. तसंच सामाजिक विषयावरच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. त्यांच्या इतरही अनेक चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. दोघी, जिंदगी जिंदाबाद, दहावी फ, वास्तुपुरुष, देवराई, नितळ, एक कप च्या, घो मला असला हवा, संहिता, अस्तू, कासव हे त्यांची काही प्रमुख चित्रपट आहेत. या चित्रपटांचं लेखन आणि दिग्दर्शनही त्यांनीच केलं आहे.

सुमित्रा यांनी अनेक चित्रपट, मालिका आणि लघुपटांचं लिखाणही केलं आहे. झोपडपट्टीतल्या महिलांचं आयुष्य दाखवणारा बाई हा सुमित्रा यांचा पहिला लघुपट हा त्यांच्या स्त्रीवाणी या शोधप्रकल्पाचा भाग होता. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. त्यांचा पुढचा लघुपट पाणी यालाही राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. त्यानंतर त्यांनी मुक्ती, चाकोरी, लहा, थ्री फेसेस ऑफ टुमारो असे लघुपट बनवले. सुमित्रा यांना त्यांच्या योगदानाबद्दल चित्र रत्न पुरस्कार आणि कामधेनू पुरस्कारही मिळाला.