या देशानं कोरोनाला हरवलं; मास्क घालण्यावरील निर्बंध उठवणारा पहिला देश
कोरोना इम्पॅक्ट बातमी

या देशानं कोरोनाला हरवलं; मास्क घालण्यावरील निर्बंध उठवणारा पहिला देश

नवी दिल्ली : जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असताना इस्रायलनं कोरोनाच्या या लढाईत विजय मिळवला आहे. सार्वजनिक ठिकाणी आणि खुल्या शाळांमध्ये मास्क बंधनकारक नसेल असं इस्राईल सरकारकडून जाहीर केलं आहे. लसीकरणाच्या जोरावर इस्रायलने हे करुन दाखवलं आहे. मास्क घालण्यावरील निर्बंध उठविणारा इस्राईल हा जगातील पहिला देश ठरला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

इस्रायलमध्ये आता सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणं बंधनकारक नसेल. मात्र बंदिस्त ठिकाणी आणि गर्दी होण्याऱ्या कार्यक्रमात मास्क घालणं बंधनकारक असेल असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. तसेच शिक्षण संस्थाही पूर्ण क्षमतेने सुरु करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर खुल्या शाळांमध्ये मास्क घालण्यास कोणतंही बंधन नसेल असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. तसेच विदेशी पर्यटकांचं येत्या मे महिन्यापासून लसीकरण करण्यात येणार असल्याचे इस्राईल सरकारकडून जाहीर करण्यात आलं आहे.

दरम्यान, गेल्या वर्षी इस्रायलमध्ये ८ लाख ३६ हजार लोकांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. त्यापैकी ६ हजार ३३१ जणांचा कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे खडबडून जागं झालेल्या प्रशासनाने लसीकरणावर जोर दिला. देशातील एकूण लोकसंख्येपैकी ५३ टक्के जनतेचं लसीकरण केल्याचं आरोग्यमंत्रालयाकडून जाहीर करण्यात आलं आहे. जवळपास ५३ टक्के नागरिकांना कोरोना लसीचा दूसरा डोस देण्यात आला आहे. या लसींमध्ये पी फायझर आणि बायो एनटेक लसींचा समावेश आहे.