चला हवा येऊ द्या फेम सागर कारंडेची या मालिकेत एण्ट्री
मनोरंजन

चला हवा येऊ द्या फेम सागर कारंडेची या मालिकेत एण्ट्री

मुंबई : चला हवा येऊ द्या फेम सागर करांडे आता झी युवा वाहिनीवरील डॉक्टर डॉन या मालिकेतून छोट्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. देवदत्त नागे, श्वेता शिंदे आणि रोहिणी हट्टंगडी अशा दिग्गज कलाकारांसोबत आता सागरसारखा दिग्गज अभिनेताही मालिकेत काम करणार आहे. अल्पावधीतच ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडली. मालिकेचा वेगळा विषय, डॉक्टर डॉन आणि त्याच्या पंटर मंडळींचा जलवा या सगळ्या गोष्टी प्रेक्षकांच्या लाडक्या ठरल्या.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

सागर हा मालिकेतील मोनिकाचा मित्र विक्रांत आणि कॉलेजचा डीन असणार आहे. आता तो देवा आणि मोनिकाच्या मध्ये येणार का किंवा मोनिका देवाला सोडून विक्रांत सोबत जाणार हे प्रेक्षकांना आगामी भागात पहायला मिळेल. या नवीन भूमिकेबद्दल बोलताना सागर म्हणाला, बऱ्याच दिवसांपासून डॉक्टर डॉन मालिकेत कॉलेजचे नवीन डीन विक्रांत यांच्याबद्दल खूप चर्चा सुरु आहे आणि विक्रांतची भूमिका मला साकारायला मिळाली याबद्दल मी खूप आनंदी आहे. खूप वर्ष कॉमेडी केल्यानंतर कलाकाराला नेहमीच काहीतरी वेगळं करायची इच्छा असते आणि मी नेहमीच काहीतरी नविन करण्याच्या शोधात असतो.

याआधी मी काही मालिकांमध्ये गेस्ट एक्सपिरियन्स केले आहेत. ४-५ भागांसाठी ती व्यक्तिरेखा असून तिची सुरुवात व शेवट मला माहिती असतो. पण इथे डॉक्टर डॉन मध्ये मला विक्रांतची सुरुवात कळली आहे, त्याचा शेवट काय असणार आहे हे प्रेक्षकांप्रमाणेच माझ्यासाठी देखील सरप्राईज असणार आहे.